Coronavirus Impact : 3 महिने पगार नाही, नैराश्यातून विधवा दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या

पटणा : वृत्तसंस्था –  कोरोनामुळे देशातील अनेक उद्योगधंदे बंद आहेत. याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्यांना याची मोठी झळ बसली आहे. अशातच एका दिव्यांग शिक्षिकेने तीन महिने पगार मिळाला नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजधानी पटण्यातील फतुहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आर्थिक अडचणीतून या अपंग विधवा शिक्षिकेने पूनपुन नदीत उडी घेत आपले आयुष्य संपवले.

या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा शोध सुरु केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून अपंग महिला शिक्षिकेची ट्राय सायकल आढळून आली असून पोलिसांनी सायकल ताब्यात घेतली आहे. शांती देवी असे आत्महत्या करणाऱ्या महिला शिक्षिकेची ओळख पटली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा प्रकार गोविंदपूर येथे घडला आहे.

शांती देवी या एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांच्या पतीचे दोन वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आपल्या दोन मुलांचे संगोपान करण्यासाठी एका खासगी शाळेत शिकवण्यास सुरुवात केली. मात्र, कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे त्यांनी तीन महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नव्हता. परिणामी या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने शांती देवी चिंतेत होत्या.

आर्थिक विवंचनेतून त्यांनी पूनपुन पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केली. महिला शिक्षिकेच्या घरातून पोलिसांनी सुसाइड नोट्सही जप्त केल्या आहेत. या घटनेबद्दल विचारले असता स्थानिक लोकांनी आणि त्यांच्या मुलीने सांगितले की, मागील काही दिवसांपासून त्या चिंतेत होत्या. त्यामुळे नैराश्येतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.