वाराणसीत नरेंद्र मोदींविरुद्ध लढणार प्रियंका गांधी ; प्रवक्त्यांचा दुजोरा

वाराणसी : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्ताला काँग्रेस प्रवक्ते दीपक सिंह यांनी दुजोरा दिला आहे. प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले असून याबाबत अधिकृत घोषणा होईल आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असेही दीपक सिंह यांनी सांगितले.
दीपक सिंह म्हणाले, प्रियंका गांधी यांची निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी झाली आहे.

प्रियंका गांधीची तशी मानसिक तयारी देखील झाली आहे. त्या आयर्न लेडी आहेत. एक धैर्यशील महिला अशी त्यांची ओळख आहे. अमेठीची निवडणूक संपल्यावर इथले लोक बनारसला पोहोचणार आहेत. तिथल्या निवडणुकीच्या लढाईत उतरण्याची आमची तयारी झाली आहे.

वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात अजूनही काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही. त्यातच उत्तर प्रदेशातल्या अमेठीचे काँग्रेसचे आमदार दीपक सिंग यांनी प्रियांका बनारसमधून लढणार असे सांगितले आहे. काँग्रेसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा करून काँग्रेस धक्का देण्याचा विचार करत आहे.

याबाबत काही दिवासांपूर्वी उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी प्रतिक्रिया दिली होती. कोणतीच गोष्ट अशक्य नसते. प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवावी अशी आज संपूर्ण देशाची इच्छा आहे. याबाबत काय निर्णय होतो, हे आता वेळच ठरवेल. असे राज बब्बर यांनी म्हटले आहे.