लोकसभा २०१९ : मोदींविरुद्ध निवडणूक लढण्यास प्रियंका तयार ! रॉबर्ट वढेरा यांनी दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींचे वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रियंका वाराणसी येथून निवडणूक लढण्यास तयार असल्याचे संकेत खुद्द प्रियांका यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी दिले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. याबाबत अंतिम निर्णय पक्षाकडून घेतला जाईल असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.

वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वढेरा यांचे म्हणणे खरे ठरले तर मात्र मोदी विरुद्ध प्रियांका असा सामना वाराणसी लोकसभा मतदार संघात पाहायला मिळणार आहे.वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ आहे. या मतदार संघातून मोदी २०१४ ला मोठ्या मताधिक्याने जिकंले होते. २०१९ मध्येही मोदी याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. २६ एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

प्रियंका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात प्रवेश केला. यानंतर त्यांना सरचिटणीसपद देण्यात आले आणि उत्तर प्रदेशमधील प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली. प्रियंका यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून त्या निवडणूक लढवणार का याबाबत चर्चा सुरू झाल्या. याबाबत प्रियंका यांना अनेकदा पत्रकारांनी प्रश्नही विचारला. तेव्हा त्यांनी पक्ष निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे म्हटले होते. आता त्यांचे पती रॉबर्ट वढेरांनी याबाबत स्पष्ट संकेत दिल्याने त्या मोदींविरोधात निवडणूक लढवण्याच्या शंकेला पाठबळ मिळत आहे.