शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात CRPF चे ३० जवान शहीत झाले. तर २८ जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी ट्वीट करुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. ट्वीटमध्ये सिंह यांनी पुलवामामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

व्ही. के. सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “भारतीय जवान आणि देशाचा नागरिक असल्याने आज पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याची माहिती मिळाल्यापासून माझं रक्त सळसळत आहे. मला खूप संताप आला आहे. या भ्याड हल्ल्यात आपले जवान शहीद झाले आहेत. मी त्या शहीद जवानांच्या शौर्याला सलाम करतो. भारतीय जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा आम्ही बदला घेतला जाईल”

दरम्यान, गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना टार्गेट केले. सीआरपीएफच्या जवानांचा ताफा अवंतीपुरा येथून प्रवास करत होती. दोन हजार ५०० जवानांचा ताफा ७० बसेसमधून प्रवास करत होता. अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी स्फोट घडवला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधूंद गोळीबारही केला. यात ३० जवान शहीद झाले आहेत, तर २० पेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत.