‘गेट वे ऑफ इंडिया’ समोरील आंदोलकांना पोलिसांनी ‘हटवले’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जवाहरलाल विश्व विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया समोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना मंगळवारी सकाळी पोलिसांनी तेथून हटविले. या आंदोलकांना आझाद मैदान येथे घेऊन जाण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

जेएनयुमधील हिंसाचाराच्या विरोधात विद्यार्थींनी रविवारी रात्रीपासून गेट वे ऑफ इंडियासमोर आंदोलन सुरु केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यात प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादीसह डाव्या पक्षांशी संबंधित संघटना सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी गेट वे ऑफ इंडियावर येऊन पाठिंबा दिला.

गेट वे ऑफ इंडियावर नेहमीच नागरिकांची मोठी गर्दी असते. या आंदोलनामुळे तेथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे विद्यार्थी हे ठाण मांडून बसले आहेत. या संरक्षित ठिकाणी कोणालाही आंदोलन करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. पोलिसांनी या आंदोलकांना हे वारंवार सांगितले होते. त्यांनी आझाद मैदान येथे आंदोलन करावे. या ठिकाणी त्यांना व इतरांनाही मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

आझाद मैदानावर याबाबत अनेक सुविधा आहेत. असे पोलीस उपायुक्त निशानदार यांनी आंदोलकांना सांगितले होते. तरीही आंदोलक तरुण तेथून हटायला तयार नव्हते. त्यामुळे शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करुन पोलीस व्हॅनमध्ये बळजबरी टाकून त्यांची रवानगी आझाद मैदान येथे करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/