ED च्या निषेधार्थ राज्यात सर्वत्र निदर्शने – रास्ता रोको तर हिंगोलीत जाळपोळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सक्तवसुली संचालनालयाने शरद पवार यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आज आंदोलने करण्यात येत असून हिंगोलीत कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करुन रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे.

शरद पवार हे आज दुपारी ईडीच्या कार्यालयात स्वत: जाणार आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात अनेक ठिकाणी बंद पुकारला आहे. काही ठिकाणी रास्ता रोको केला जात आहे. पिंपरी चिंचवड, मावळ, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे.

हिंगोलीत आज सकाळपासून कार्यकर्त्यांनी अकोला रोडवर ठिय्या मारुन रास्ता रोको केला. त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात टायर जाळला असून या आंदोलनामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे.

पोलीस सहआयुक्त शरद पवार यांच्या भेटीला-

मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त (कायदा सुव्यवस्था ) चौबे यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट दिली. शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये, अशी विनंती केली. मात्र, कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याचे पोलिसांचे काम आहे. आमचे नाही असे सांगत आपण जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

मुंबई, ठाण्यात कार्यकर्त्यांची धरपकड-

दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयाकडे निघालेल्या कार्यकर्त्यांची मुंबई व ठाण्यात ठिकठिकाणी धरपकड सुरु केली आहे. मुंबईतील नवघर पोलिसांद्वारे सकाळीच लावलेल्या नाकाबंदी मुळे ठाण्यात सकाळच्या सुमारास वाहतुक कोंडी झाली. ठाणे-मुंबईच्या सिमेवर असलेल्या आनंदनगर चेक नाका ते माजीवडा नाक्यापर्यंत वाहनांच्या एका पाठोपाठ रांगा लागल्या होत्या. मुंबईतही ठिकठिकाणी नाकाबंदी करुन मुंबईकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवून त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन –

पोलिसांनी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड केल्यानंतरही शेकडो कार्यकर्ते राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोहचले असून त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे.

Visit : policenama.com