हडपसर पोलीस स्टेशनमध्ये 11 हजार मजुरांचे अर्ज, राज्य आणि परराज्यात गावाकडे जाण्यासाठी ‘घालमेल’ सुरूच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य आणि परराज्यातील मजुरांना गावी जाण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये अर्जपूर्तता केल्यानंतर परवानगी दिली जात आहे. त्यासाठी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत 11 हजार 251 जणांनी अर्ज केले आहेत. त्यातील 450 महाराष्ट्रातील तर 1200 परराज्यातील मजूरांना गावी जाण्याची प्रशासनाने व्यवस्था केली आहे, अशी माहिती हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी दिली.

हडपसर परिसरामध्ये मजूरवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असून, रोजगार नाही. त्यामुळे प्रशासनाच्या नियमानुसार त्यांना गावी जाण्यासाठी अर्ज भरून घेऊन तो पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त कार्यालयाकडे पाठविण्याचे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे आणि पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, सोमनाथ सुतार, रामेश्वर नवले, राहुल माने, अनिल सरडे आणि पोलीस मित्र-स्वयंसेवक कार्यकर्ते करीत आहेत. राज्यातील मजुरांचे अर्ज पोलीस उपायुक्त कार्यालयामध्ये पाठवले जातात, तर परराज्यातील अर्ज पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पाठविले जातात. तेथे अर्जांची छाननी करून मजुरांना गावी जाण्याची परवानगी दिली जात आहे. त्यासाठी एस.टी. आणि रेल्वेची व्यवस्था आहे. एसटी आणि रेल्वेतील जागेनुसार त्यांना पोलीस स्टेशनमार्फत कळविले जात आहे.

मागिल चार-पाच दिवसांपासून हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गावी जाण्यासाठीचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आजपर्यंत सुमारे 11 हजार 251 मजुरांचे अर्ज भरून घेऊन ते पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त कार्यालयाकडे पाठविले आहेत. त्यातून 450 जण राज्यातील, तर 1200 जण परराज्यातील मजूर आहेत. परराज्यामध्ये काही नव्याने उद्योग सुरू होत आहेत, त्यामुळे तेथे आम्ही नोकरी करू अशीही भावना अनेकांनी व्यक्त केली.

दरम्यान, राज्य आणि परराज्यातील मजुरांनी अर्जप्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, तोपर्यंत अनेकांनी पायी, सायकलवर गावाकडे धूम ठोकली आहे. त्यामुळे त्यांची प्रशासनाने एसटी किंवा रेल्वेने सोय केली असूनही त्याचा लाभ त्यांना घेता येत नाही, अशी अवस्था आहे. मजूरवर्गाने अर्ज केल्यानंतर येथेच थांबणे महत्त्वाचे आहे. मात्र, मजूर वर्ग थांबण्याच्या स्थितीत नाही. मुला-बाळांना घेऊन तो पायपीट करीत राज्य आणि परराज्याकडे निघाला आहे. मागिल आठवड्यात औरंगाबाद-जालना लोहमार्गावर पायी जाणाऱ्या मजूरांना रेल्वेच्या मालगाडीने चिरडले. तशीच घटना रस्ते मार्गावरही घडली. मजुरांच्या गर्दीने रस्ते भरभरून वाहू लागले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे घाबरलेला मजूर वर्ग गावाकडे जाण्यासाठी अतूर झाला आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मजूर वर्गाला गावी जाण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करून त्याची पूर्तता करून परवानगी दिली जात आहे. अर्धपोटी आणि उपाशी राहण्यापेक्षा आम्ही आमच्या गावी जाऊन सुखी राहू, असे रा्ज्य आणि परराज्यातील मजुरांनी सांगितले.

पोलिसांनी केली जेवणाची व्यवस्था
राज्य आणि परराज्यातील मजुरांकडून फक्त अर्ज भरून घेण्याचे नाही, तर त्यांना आधार देण्याचे काम केले जात आहे. त्यांची विचारपूस करून त्यांना आधार दिला जात आहे. तसेच अर्ज भरण्यासाठी वेळ झाला तर दुपारचे जेवण देण्याची व्यवस्थाही हडपसर पोलिसांकडून केली आहे.