Pune : खाद्यपदार्थ घरपोच करणार्‍या डिलिव्हरी बॉयकडून 2 किलो गांजा जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – ऑनलाइन घरपोच पदार्थ पोहचविणाऱ्या डिलिव्हरी बॉयला विश्रांतवाडी पोलिसांनी 2 किलो गांजासह पकडल्याची घटना समोर आली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सागर दिलीप पवार (वय २०,रा. वाघेश्वरनगर, वाघोली) याला अटक केली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळ रस्त्यावर ऑनलाइन खाद्यापदार्थ घरपोच देणाऱ्या एकाकडे गांजा असून तो विक्रीस येणार असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा लावून पवार याला पकडले आहे. त्याची झडती घेतली असता त्यात गांजा मिळून आला.

त्याच्याकडून ४० हजार रूपये किंमतीचा १ किलो ९९४ गॅ्रम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याने हा गांजा कोणकडून आणला आणि तो कोणाला विक्री करणार होता, अश्या पद्धतीने त्याने यापूर्वी कोणाला गांजा विक्री केला आहे का याबाबत पोलिस तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान नरळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.