Pune : अनैतिक संबंधाला अडसर झाल्याने दिली 30 लाखाची सुपारी, त्यानंतर भरदिवसा झाला होता वानवडीत वाळू सप्लायरवर गोळीबार

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – वानवडीत भरदिवसा वाळू सप्लायरवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला असून, अनैतिक संबंधाला अडसर ठरत असल्याने 30 लाख रुपयांची सुपारी देऊन हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे.

राजेश भिकू पडवळ (वय 25,रा. गोर्हे, ता. हवेली) व बाळासाहेब अनंत जाधव (वय 52, रा. हांडेवाडी, हडपसर) अशी अटक करणत आलेल्यांची नावे आहेत. यात मयूर हांडे (वय 29) याच्यावर गोळीबार झाला होता. याप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल होता.

गेल्या आठवड्यात (दि. १२ ऑक्टोबर) रोजी दुपारी वाळू सप्लायर मयूर हांडे यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात हांडे यांच्यावर गोळ्या झाडणारा हल्लेखोर पडवळ आणि जाधव यांना पकडण्यात आले. न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हांडे यांचा खून करण्यासाठी 30 लाखांची सुपारी देण्यात आल्याची माहिती आरोपी पडवळने दिली आहे.

आरोपी बाळासाहेब जाधव बांधकाम व्यावसायिक आहे. हांडे याचा खून करण्यास जाधव यांनी तीस लाखांची सुपारी दिल्याची माहिती पडवळने पोलिसांना दिली आहे. अनैतिक संबंधावरून हांडे व जाधव यांच्यात वाद होते. त्यावरून हा प्रकार घडला आहे. वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील तपास करत आहेत.