दारूड्या कार चालकाची दोन दुचाकींना धडक, एकाच कुटूंबातील चौघे गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दारूड्या कार चालकाने एका दुचाकीला धडक दिल्यानंतर पळून जाताना समोरील आणखी एका दुचाकीला उडविले. त्यानंतर कार चालक रस्त्यावरील लाईटच्या खांबालाही जाऊन धडकला. या अपघातात एकाच कुटूबांतील चौघेजण जखमी झाले आहेत. चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. बी.जे. मेडिकल बॉईज हॉस्टेलजवळ ही घटना घडली.

मुकूंद परदेशी (वय 55, रा. मंगळवार पेठ), पत्नी प्रतिभा (वय 44) आणि मुलगा निखील (वय 22) व निहाल (वय 25) हे चौघे जखमी झाले आहेत. यात निखील व निहाल हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी कार चालक श्रीकांत अशोक पवळे (वय 35, रा. बिडी कामगार वसाहत, येरवडा) याला अटक केली आहे. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी कुटूंबिय मंगळवार पेठेत राहण्यास आहेत. दरम्यान, रविवारी त्यांच्या नातेवाईकाच्या रिसेप्शनसाठी कोरेगांव पार्क परिसरात जात होते. फिर्यादी मुकूंद व त्यांची पत्नी एका दुचाकीवर होते. तर, निहाल व निखील हे दुसर्‍या दुचाकीवर होते. ते चर्च रोडने कोरेगांव पार्क परिसरात जात होते. त्यावेळी बी. जे. मेडिकल कॉलजच्या बाईज हॉस्टेलजवळ आल्यानंतर अचानक पाठिमागून आलेल्या कारने प्रथम फिर्यादी मुकूंद यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे ते खाली कोसळले. यात त्यांची पत्नी प्रतिभा व फिर्यादी जखमी झाले. आरोपीने घटनास्थळी न थांबता पळून जाऊ लागला. मात्र, दारूच्या नशेत असल्याने तो पुढे जाऊन त्याने फिर्यादींच्या मुलांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ते दोघेही खाली कोसळले. त्यानंतर कार एका लाईटच्या खांबाला जाऊन आदळली. कारची स्पीड इतकी होती की, लाईटचा खांबही कोसळला. यानंतर नागरिकांनी येथे धाव घेऊन प्रथम चौघांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तर, कार चालक श्रीकांत याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –