काय सांगता ! होय, गेल्यावर्षी पुणे विभागातील लाचखोरी चक्क घटली, जाणून घ्या आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे परिक्षेत्रात लाच लुचपत प्रतिबंधकाच्या (एसीबी) कारवाईत 201÷8 च्या तुलनेत 2019 मध्ये 16 ने घट झाली आहे. त्यातही लाच घेण्यात पोलीस विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर महसूल विभागाचा क्रमांक लागत आहे. तत्पुर्वी चालू वर्षात पहिल्या दोन महिन्यात 28 जणांवर एसीबीने कारवाई केली असून, ही गेल्या वर्षीच्या (2019) तुलनेत जास्त आहे.

एसीबीच्या पुणे परिक्षेत्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यात एसीबीने 2019 मध्ये 184 जणांवर लाच घेताना कारवाई केली आहे. त्यात 261 आरोपींना अटक केली आहे.

पुणे जिल्ह्यातील कारवाईचे प्रमाण 45 टक्के आहे. 179 प्रकरणात उघड चौकशी तर, 58 प्रकरणात गुप्त चौकशी सुरू आहे. विभागवार विचार केल्यास पोलिस विभागात सर्वाधिक लाच घेताना कारवाई केली आहे. या ठिकाणी 51 सापळे रचून 78 जणांस अटक केली आहे. त्यानंतर महसूल विभागात लाच घेताना 42 सापळे रचून 58 जणास अटक केली आहे, अशी माहिती पुणे लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी दिली.

लाच मागितल्यास बहुतांश वेळा त्याची तक्रार केली जात नाही. अनेकांना तक्रार कशी करायची याची माहिती नसते. तर, आपले काम होणार नाही, या भितीपोटीही काहीजन तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. परंतु, तक्रार दिल्याने काम अडकून पडत नाही, तसेच लाच मागितल्यास त्याबाबत तक्रारी देण्यासाठी जनजागृती केली जाणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

तक्रार करणारे सर्वाधिक तरूण…
तक्रार करणार्‍या व्यक्तींचा अभ्यास केला असता त्यात सर्वाधिक तक्रारदार हे 26 ते 35 वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. या वयोगटातील 75 जणांनी तक्रार दिल्या आहेत. तर, 25 पेक्षा कमीचे 12, 36 ते 45 वयोगटातील 58, 46 ते 60 वयोगटातील 31 व 60 पेक्षा जास्त वयोगटातील आठ जण आहेत. 25 पेक्षा कमी वयोगटातील तक्रारी कमी वाटत आहेत.

पुणे विभागाला बेस्ट रेंजचा पुरस्कार
देशात सर्वाधिक लाचखोरांवर कारवाई ही महाराष्ट्रात होते. त्यात पुणे परिक्षेत्रात सर्वाधिक कारवाई झाली आहे. त्यामुळे पोलिस महासंचालकांकडून पुणे विभागाला ‘बेस्ट रेंज’ हा पुरस्कार देऊन गौरविले आहे. जनजागृतीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना तसेच कार्यक्रम घेतले जातात. त्यातून जनजागृती केली जाते. व्याख्यान, पोस्टर, व्हिजीटींग कार्डचे वाटप केले जाते.

हेल्पलाईनवर 1099 कॉल
नागरिकांना लाचखोरांविरोधात तक्रार देण्यासाठी एसीबीने 1064 ही हेल्पलाईन सुरू केली. गेल्या वर्षात एसीबीच्या 1064 हेल्पलाईनवर तब्बल 1099 कॉल आहे आहेत. या कॉलची दखल घेऊन यशस्वी कारवाई केली गेली आहे.