चौफुला कला केंद्रातील ‘नर्तिके’वर ‘आवारा आशिक’चा कोयत्यानं जीवघेणा हल्ला

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) –  दौंड तालुक्यातील चौफुला येथे असणाऱ्या रेणुका कला केंद्रातील एका नर्तिकेवर पाटस येथील एका आवारा आशिकने कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे चौफुला परिसरामध्ये असणाऱ्या कला केंद्रांमध्ये एकच खळबळ माजली असून यवत पोलिसांनी हल्ल्यातील आरोपी मनोज सखाराम उजागरे (रा.पाटस ता.दौंड) याच्यावर नर्तिकेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३० जानेवारी रोजी रात्री १०:३० वा.सुमारास रेणुका कला केंद्रातील रूममध्ये ही नर्तिका एकटी बसलेली असताना तेथे अचानकपणे आरोपीने येऊन तु मला आवडते, तु इतर कोणाही पुरूषाशी बोलायचे नाही असे तुला वारंवार सांगितले असतानाही तु माझे ऐकत नाही असे म्हणून हुज्जत घालू लागला. यावेळी या नर्तिकेने हे कला केंद्र आहे मला नाचगाणे करताना इतर पुरूषांशी बोलणे भाग पडते असे म्हणताच आरोपीने तिला हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करत कमरेला असलेला धारदार कोयता काढून नर्तिकेच्या मानेवर, गालावर, उजवे दंडावर व पाठीवर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

आरोपीने नर्तिकेवर हल्ला केल्यानंतर आता तुझ्या मुलाला, घरच्यांनासुद्धा जिवे मारणार अशी धमकी देवुन निघुन गेला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या नर्तिकेचा ओरडण्याचा आवाज ऐकुन कलाकेंद्रातील इतर लोकांनी रूमकडे धाव घेत हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नर्तिकेला तातडीने रुग्णालयामध्ये भरती केले असून पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.