सिमकार्ड 4G करण्याच्या बहाण्यानं महिलेची सव्वा लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सिमकार्ड फोरजी करण्याच्या बहाण्याने एका महिलेला सायबर चोरट्यांनी सव्वा लाखाचा गंडा घातला. मे महिन्यात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या खासगी कंपनीत नोकरी करतात. दरम्यान त्यांना 8 मे रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तसेच त्यांना एका नामांकित कंपनीतून बोलत असून तुमचे सिमकार्ड 4जी अपडेट करायचे आहे, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर एक एसएमएस केला. तसेच तो एका क्रमांकावर पाठवण्यास सांगितला. तो पाठविल्यानंतर त्यांच्या मोबाईलचा आणि बँकेचा एक्सेस घेऊन त्यांच्या खात्यातून 1 लाख 19 हजार रुपये ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केली. अधिक तपास वानवडी पोलिस करत आहेत.