कर्जाच्या बहाण्याने सव्वा दोन लाखांची फसवणूक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – बजाज फायनान्सच्या माध्यमातून पाच लाखांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाला सव्वा दोन लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. सप्टेंबर 2019 मध्ये ही घटना घडली आहे.

याप्रकरणी विराट सोनवणे (वय 37, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट हे एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांना पैशांची आवश्यक्ता होती. त्यासाठी त्यांनी कर्ज घेण्याचे ठरविले. तसेच, ऑनलाईनरित्या कर्ज घेण्याची नोंदणी केली. त्यानुसार सायबर चोरट्यांनी विराटला बजाज फायनान्स कंपनीतून 5 लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी विविध प्रोसिसिंग फि म्हणून वेळोेवेळी 2 लाख 20 हजार रुपये घेउन फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके अधिक तपास करीत आहेत.