Pune : ठेकेदाराकडील कर्मचार्‍यांना बोनस मिळणार ! महापालिका प्रशासनाने दिले विभागप्रमुखांना आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करणार्‍या ठेकेदारांकडील कंत्राटी कामगारांना २०१९ – २०२० या वर्षातील बोनस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकीकडे कोरोनाच्या लॉकडाउनमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले असताना कायम कामगारांच्या बोनसचा अद्याप निर्णय झाला नसला तरी कंत्राटी कामगारांना मात्र दिलासा मिळाला आहे.

महापालिकेने ठेकेदारी पद्धतीने नेमलेल्या कंत्राटी कामगारांना बोनस प्रदान अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार बोनस अदा केला जातो. संबधित कामगारांचे मुळ भत्ता आणि विशेष भत्ता असे दोन्ही मिळून २१ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असेल व एक वर्षाच्या कालावधीत ३० दिवसांपेक्षा अधिक काम केल्यास बोनस देणे बंधनकारक आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांकडून कंत्राटी कामगारांची निविदा प्रक्रिया राबविताना सदर कामामध्ये बोनसची रक्कम समाविष्ठ करण्यात आली आहे, अशा कामावरील कंत्राटी कामगारांना बोनस देणे क्रमप्राप्त आहे. ज्या ठेकेदारांकडून त्यांच्याकडील कंत्राटी कामगारांना प्रत्येक महिन्याच्या वेतनातून बोनस देण्यात येतो त्यांना ही बाब लागू नाही.

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सध्या साडेपाच हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. त्यापैकी बहुतांश कर्मचारी हे वार्षिक एकवट वेतनावर काम करतात त्या ठेकेदारांकडील कर्मचार्‍यांना बोनस मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.