कबुतर पकडून पिंजऱ्यात ठेवलं, पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टेरेसवर बसलेले कबुतर पकडून ते पिंजऱ्यात ठेवल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे ही घटना घडली असून 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Advt.

वडगाव बुद्रुक येथील जाधवनगर येथे तक्रारदार मुलगा त्याच्या आई, भाऊ आणि आजी सोबत राहतो. तो दहावीत शिकतो. त्याच्या घराजवळील परिसरात एका मुलाने कबुतर पाळले आहेत. एक महिन्यापूर्वी त्याच्या कडील एक कबुतर तक्रारदार मुलाच्या घराच्या टेरेसवर येऊन बसले. त्यावेळी त्याने ते कबुतर पकडून पिंजऱ्यात ठेवले. हा प्रकार कबुतर पाळणाऱ्या मुलाने पाहिला. त्याने त्यावेळी आपल्या साथिदार मित्रांच्या मदतीने तक्रारदार मुलाला शिवीगाळ करुन मारहाण केली होती.

दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसोबत पडक्या घरात मोबाइलवर गेम खेळत बसला होता. त्यावेळी कबुतर पाळणारा मुलगा आपल्या दोन साथिदारांसह त्या ठिकाणी आला. त्याने एक महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या हाताच्या मनगटावर आणि पायावर कोयत्याने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याचे मित्र आले असता त्यांनाही मारहाण केली. त्यामुळे घाबरलेले त्याचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले. जखमी अवस्थेत अल्पवयीन मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.