पुण्यात PMPML बसमध्ये पाकीटमारी करणार्‍याला अटक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पीएमपीएल प्रवासादरम्यान प्रवाशांचे पाकिट चोरणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट चारने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याचे इतर तीन साथीदार पसार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

गणेश सिद्राम गायकवाड (वय 34, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शहरात घरफोड्यांसोबतच पीएमपीएलमधील चोर्‍या करणार्‍या टोळ्यांनी हैदोस घातला आहे. गेल्या काही महिन्यापांसून सुरू असणार्‍या या चोर्‍या काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ महिला, नागरिकांना लक्ष करून चोरटे लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. दरम्यान, या चोरट्यांना पकडण्याचे सूचना स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेला देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट चारचे पथक या चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी उपायुक्त बच्चनसिंह यांना माहिती मिळाली होती की, शहरात या चोर्‍या करणारे तीन ते चार टोळ्या असून, त्या वेगवेगळ्या भागात प्रवास करून चोर्‍या करत आहेत. त्याचवेळी चंदननगर बी.आर.टी बस स्टॉपवर चारचे पथक सापळा लावून थांबले होते. त्यावेळी सहाय्यक फौजदार अब्दुलकरीम सय्यद व पोलीस नाईक सुरेंद्र साबळे यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश गायकवाड हा संशयितरित्या फिरत आहे. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक विजय झंझाड व त्यांच्या पथकाने गायकवाड याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने गुनहा केल्याची कबूली दिली. त्याला अटककरून सखोल तपास केल्यानंतर त्याने विमानतळ परिसरात दोन गुन्हे केल्याचे सांगितले.

त्याने व त्याच्या तीन साथीदारांनी हे गुन्हे केले असून, तिघे पसार आहेत.त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पाकिट मारी करणारी एका टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता उर्वरित टोळ्यांनाही लवकर अटक करण्याची गरज असल्याचे नागरिकांडून अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यानंतरच या गुन्ह्यांना पायबंद बसणार आहे.