पुण्यातील नामांकित शाळेतील शिपायानं चक्क नगरसेवकाचा लेटरपॅड वापरला, मुलाला प्रवेश देवुन पालकांकडून उकळले 1.5 लाख

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – नामांकित शाळेतील शिपायानेच नगरसेवकाच्या लेटरपॅडचा वापरकरून एका मुलाला शाळेत प्रवेश मिळवून देत पालकांकडून दीड लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने लेटरपॅडवर नगरसेवकाची बनावट स्वाक्षरी केल्याचे सांगण्यात येते.

विजय नानासाहेब यादव (वय ३०, रा. उंड्री) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नगरसेवक साईनाथ बाबर (वय ३८, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्रीतील एका नामांकित शाळेमध्ये विजय शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याने एकाच्या मुलाला शाळेत प्रवेश मिळवून देण्याची बतावणी करुन दीड लाख रुपये घेतले. त्यासाठी विजयने नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या लेटरपॅड मिळवला. त्यावर संबंधित पाल्यांचा अर्ज टाईप केला.

त्यानंतर विजयने साईनाथ बाबर यांची बनावट स्वाक्षरी केली आणि मुलाला शाळेत प्रवेश मिळवून दिला. ऑडिटदरम्यान लेटरपॅडवरील सही बनावट असल्याचे दिसून आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बाबर याना देखील हा प्रकार समजला. दरम्यान त्याने बाबर यांचा लेटरपॅड कसा मिळवला हे तपासले जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चैत्राली गपाट करीत आहेत