पुण्यात गप्पा मारणार्‍या तरूणांना टोळक्याची बेदम मारहाण

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – गप्पा मारत बसलेल्या दोन तरुणांना दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने विनाकारणच बेदम मारहाण करून दहशत निर्माण केली. लोहगाव परिसरातील तीस खोली येथील राजगड हॉल येथे ही घटना रात्री घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

बबुल संतोष चव्हाण (वय 20, रा. संजय पार्क, लोहगाव), प्रितेश पांडुरंग मोतेकर (वय 19, रा. येरवडा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर, त्यांचे 5 ते 7 साथीदार पसार झाले आहेत. याबाबत विशाल चौधरी (वय 22) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल व त्याचा मित्र समीर हालीमा असे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कलवड वस्तीमधील तीस खोली येथील राजगड हॉलजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी अचानक तीन ते चार दुचाकीवरून सात ते आठ जणांचे टोळके येथे आले. त्यांनी विमानकारणच फिर्यादी व त्यांच्या मित्रांशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर लाथा-बुक्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तर, हवेत दांडके व कोयते फिरून मोठमोठ्याने आरडा ओरडाकरून दहशत निर्माण केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी दोघांना अटक केली. त्यांचे साथीदार पसार झाले आहेत. अधिक तपास सहायक निरीक्षक जुबेर मुजावर हे करत आहेत.