गाड्यांची ‘तोडफोड’ अन् चौकीत ‘राडा’, पोलिसाला ‘धक्का’ देत केलं फिल्मी स्टाईल ‘पलायन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गाड्यांची तोडफोड केल्यानंतर तक्रार देण्यास चौकीत गेलेल्या तरुणापुर्वीच दहा ते बारा जणांच्या टोळक्यासोबत चौकीत आला. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात येत होते. परंतु, त्याने चौकीच्या बाहेर राडा घालून पोलीसाला धक्काबुकी करत ढकलून दिले अन् जमलेल्या नागरिकांमधून फिल्मी स्टाईलने पळ काढल्याचा प्रकार खडक परिसरात घडला आहे.

याप्रकरणी मॉन्टी नावाच्या तरुणावर खडक पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल पाटेकर यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉन्टी काशेवाडी परिसरात राहण्यास आहे. रविवारी रात्री इमरान शेख हा काशेवाडी पोलीस चौकीत आला. तसेच, त्याने मॉन्टी याने गाडीची तोडफोड केल्याबाबत तक्रार सांगितली. त्याचवेळी मॉन्टी चौकीत दहा ते बारा जणांच्या टोळक्यासोबत आला. यावेळी पोलीस शिपाई अमोल पाटेकर यांनी त्याला झालेल्या प्रकाराबाबत विचारपूस केली असता. त्याने अमोल पाटेकर यांनाच अपशब्द वापरण्यास सुरूवात केली. त्यामुळे या परिसरात गोंधळ उडाला. यामुळे फिर्यादींनी पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. त्यामुळे ठाणे अंमलदार यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्या दोघांनाही पोलीस ठाण्यात घेऊन येण्यास सांगितले.

त्यावेळी अमोल पाटेकर हे त्याला पोलीस ठाण्यात येण्यासाठी सांगू लागले. मात्र, त्याने अमोल पाटेकर यांनाच धक्काबुक्की करत गोंधळ घातला. तसेच, त्यांना ढकलून दिले. यात ते खाली कोसळले. यानंतर तो जमललेल्या नागरिकांच्या गराड्यातून फिल्मी स्टाईलने पळून गेला. तर, त्याच्यासोबत आलेलेही टोळके पसार झाले. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.