दमदाटी करून धमकी देत 75 हजाराची ‘वसुली’ करणारे पुण्यातील गुन्हे शाखेतील 2 पोलिस कर्मचारी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चौकशीसाठी पोलिस आयुक्‍तालयातील गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकात नेऊन आणि त्यानंतर हिराबाग चौकात भेटून दमदाटी करून तसेच धमकी देवुन 75 हजार रूपये घेणार्‍या 2 पोलिस कर्मचार्‍यांना गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्‍तांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एकनाथ किसन कंधारे आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप रामचंद्र शिंदे अशी निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 27 ऑगस्ट 2019 रोजी दोघांनी एका व्यक्‍तीस घराजवळून ताब्यात घेतले आणि गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकात चौकशीसाठी आणले. त्यास आम्ही एका गुन्हेगाराकडून गावठी पिस्तुल व काडतुसे जप्‍त केल्याचे सांगुन तो गुन्हेगार तुझ्याकडे देखील अग्‍नीशस्त्रे असल्याचे सांगत असल्याचे सांगितले. तु ती अग्‍नीशस्त्रे आम्हाला दे असे म्हणुन दोघांनी त्यास शिवीगाळ केली. काही वेळानंतर पोलिस कर्मचारी कंधारे आणि शिंदे यांनी त्यास सोडून दिले. तो गुन्हे शाखेतून गेल्यानंतर त्याच्यासोबत फोनव्दारे संपर्क साधण्यात आला.

पोलिसांनी त्यास हिराबाग चौकात बोलावून घेतले. दमदाटी करून व धमकी देवुन त्याच्याकडून तब्बल 75 हजार रूपये घेण्यात आले. ही बाब उघडकीस आली. वरिष्ठांनी सखोल चौकशी केल्यानंतर कंधारे आणि शिंदे यांनी संबंधिताकडून 75 हजार रूपयांची वसुली केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिस उपायुक्‍त बच्चन सिंह यांनी दोघांना तात्काळ निलंबीत केले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश शनिवारी रात्री उशिरा काढण्यात आले. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकात चौकशीसाठी नेवुन अशा प्रकारचा उद्योग पोलिस कर्मचार्‍यांनी केल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.