Pune Drug Case | जप्त केलेल्या 3500 कोटी रूपयांच्या ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य सुत्रधार संदीप धुनिया, केंद्रीय तपास यंत्रणांकडून देखील युध्दपातळीवर तपास सुरू

पुणे : ( नितीन पाटील ) Pune Drug Case | पुणे पोलिसांनी राज्यासह इतर राज्यात छापे टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य सुत्रधार संदीप धुनिया (Sandip Dhunia) हा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आसून त्याच्या तपासासाठी आता थेट ‘केंद्रीय तपास यंत्रणां’ची मदत घेतली जाणार आहे. याशिवाय सीबीआयच्या मदतीने पुणे पोलिसांनी ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावण्याची तजवीज केली असून आरोपी सध्या आखाती देशातील कुवैत येथे असल्याची महत्वाची माहिती पोलिसांना मिळाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ड्रग्ज प्रकरणामध्ये विशेष वकिलांची नेमणूक करून जलदगती न्यायालयात हा खटला चालवला जाणार आहे.

एनआयए, सीबीआय, एनसीबी, एटीएस यंत्रणांचा तपासात सहभाग

पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत तब्बल 3 हजार 500 कोटी रुपयांचे 1760 किलोच्या आसपास मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले आहे. या प्रकरणाच्या तपासामध्ये एनआयए, सीबीआय, एनसीबी आदी राष्ट्रीय यंत्रणांसह राज्याच्या दहशतवाद विरोधी पथक देखील सहभागी झाले आहे. ‘टेरर फंडिंग’, ‘अंडरवर्ल्ड’ यासह हवाला रॅकेटचा देखील तपास केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (IPS Amitesh Kumar)

संदीप धुनिया (रा. पाटणा, बिहार) असे मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. यापूर्वी वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय 40, रा. सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय 35, रा. भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय 40, रा. विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (वय 40), युवराज बब्रूवान भुजबळ (वय 41, रा. डोंबिवली पश्चिम), दिवेश चिरंजीव भुटीया (नवी दिल्ली), संदीप राजपाल कुमार (रा. नवी दिल्ली) आणि संदीप हनुमानसिंग यादव (रा. नवी दिल्ली), आयुब अकबरशहा मकानदार (वय 44, रा. कुपवाड, सांगली) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विठ्ठल वसंतराव साळुंखे (वय 47) यांनी फिर्याद दिली आहे.

मुख्य आरोपीकडे ब्रिटिश पासपोर्ट

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुनिया हा मूळचा भारतीय असून त्याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. त्याला ‘डीआरआय’ने 2016 साली कारवाई करीत 150 किलो ‘एमडी’ जप्त केले होते. त्यावेळी ‘डीआरआय’ने यातील आरोपी विपिन कुमार याला पुण्यातून अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संदीप धुनियाला अटक करण्यात आली होती. विपिन कुमार सध्या येरवडा कारागृहात बंद आहे. तर, संदीप धुनिया हा जामिनावर बाहेर आहे. त्यानेच ‘अर्थकेम लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीमधील केमिकल तज्ज्ञ युवराज भुजबळ याला ‘एमडी’ बनवण्याचे काम दिले होते.

एमडी नेपाळ मार्गे लंडनला पाठवले जाणार होते

पुणे ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनिया हा 30 जानेवारी रोजी नेपाळमधील काठमांडू येथे गेला होता. याठिकाणी त्याने एमडी ठेवण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. पुणे पोलिसांनी दिल्लीत पकडलेले एमडी नेपाळमध्ये लपवले जाणार होते. तेथून ते लंडन येथे पाठवले जाणार होते. दरम्यान, धुनिया नेपाळमधून कुवैतला पळून गेला.

येरवडा कारागृहात एकमेकांच्या संपर्कात

पुण्यात डीआरआयने केलेल्या कारवाईमध्ये सांगली येथील आयुब मकानदार याला अटक करण्यात आली होती. मकादनदार, विपिन कुमार आणि संदीप धुनिया हे तिघे येरवडा कारागृहात होते. त्यावेळी आरोपी माने आणि हैदर शेख हे या आरोपींच्या संपर्कात आले. त्याठिकाणी त्यांची ओळख होऊन ड्रग्ज रॅकेटची नवी टोळी तयार झाली. संदीप जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा ड्रग्ज तयार करण्यास सुरुवात केली. त्याने युवराज भुजबळ याला दोन हजार किलो ड्रग्ज निर्मितीचे टार्गेट दिले.

केमिकल कंपन्यांना एमडी तयार करण्याचे काम?

संदीप याने देशातील वेगवेगळ्या भागातील केमिकल कंपन्या आणि लॅबोरेटरी यांना एमडी ड्रग्ज तयार करण्याचे काम दिल्याचा संशय पोलिसांना आहे. 2016 मध्ये डीआरआय ने केलेल्या कारवाईमध्ये अशाच प्रकारे केमिकल एक्पर्टची मदत घेण्यात आली होती. यातील काहीजण अद्याप कारागृहात असून त्यांच्याकडे देखील चौकशी केली जाणार आहे.

‘सप्लाय चेन’वर लक्ष केंद्रित

एमडी ड्रग्जची निर्मिती झाल्यानंतर तयार झालेले ड्रग्ज कुठे कुठे आणि कोणा कोणाला पाठवायचे होते याचा शोध घेतला जात आहे. कारखाना सील केल्यानंतर किरकोळ ड्रग्ज तस्करांवर लक्ष केंद्रीत केले. मात्र, आता सर्वसामान्यांना ड्रग्ज विक्री करणाऱ्यावर लक्ष केंदित केले आहे. या प्रकरणात आणखी पाच जणांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या भागात रवाना केली आहेत. जवळपास 16 पथकांकडून लहान विक्रेते, माल पोचवणारे यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

कुरिअर विमानाने ड्रग्जची लंडनला डिलिव्हरी

फूड पॅकेट्स मधून एमडी ड्रग्ज भारतातून लंडन येथे पाठवल्याचे असल्याचे समोर आले आहे. हे ड्रग्ज कुरिअर विमानाने पाठवले होते. मागील दोन ते अडीच वर्षांपासून दिल्लीमधून हे ड्रग्ज लंडनला मोठ्या प्रमाणावर पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

सोनम पंडित सोबत प्रेमसंबंध

संदीप धुनिया याच्यावर डीआरआय ने कारवाई केल्यानंतर विपिन कुमारला देखील अटक केली. दरम्यान, संदीप आणि विपीन याची पत्नी सोनम पंडित यांच्यात प्रेमसंबंध जुळले. ती मुलांना घेऊन संदीपकडे राहण्यास गेली. त्यावेळी विपीनच्या वडिलांनी आपली सून आणि नातवडांचे संदिप याने अपहरण केल्याची तक्रार बिहार पोलिसांकडे दिली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर विपीनच्या वडिलांनी आत्महत्या केली. या दोन्ही प्रकरणात संदीप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदेशाला केराची टोपली

राज्यातील विविध केमिकल कंपन्यांमध्ये होत असलेल्या ड्रग्ज निर्मितीच्या प्रकरणामुळे एक आदेश काढला होता. यात एमआयडीसी, एफडीए आणि एमपीसीबी, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या कारवाई आणि तपासणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. मात्र, एमआयडीसी, एफडीए आणि एमपीसीबी कडून या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होते.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि सुनिल तांबे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MP Raksha Khadse | नाथाभाऊंच्या भाजपा घरवापसीबाबत रक्षा खडसेंचे सूचक वक्तव्य, ”बरेच लोकांचीही इच्छा…”

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, वाकड परिसरातील घटना; तिघांना अटक

Lok Sabha Election 2024 | पिंपरी : जास्त बुथ संख्या असलेल्या मतदान केंद्रांची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil | ”…तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”; छगन भुजबळांची मागणी, प्रकरण काय?