फुरसुंगीतील कंपनीला लागलेली आग SPO आणि अग्निशमन दलाने विझविली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सासवड रस्त्यावरील फुरसुंगीमधील (ता. हवेली) लिप्टन चहाच्या कंपनीला आग लागली होती. यावेळी विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी (एसपीओ) प्रसंगावधान राखून पाणी मारले आणि तातडीने हडपसर एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी 15 मिनिटांत आग आटोक्यात आली. गुरुवारी (दि. 28) दुपारी आग लागल्याची घटना घडली.

मंतरवाडी येथील कडबा कुट्टीतून गायींसाठी चारा आणण्यासाठी भगवा पथकातील विशेष पोलीस अधिकारी शादाब मुलानी, नीलेश पवार, मयुरेश जाधव, मयूर शिंदे, ओम राऊत, पंकज भारती जात होते. त्यावेळी फुरसुंगी येथील लिप्टन चहाच्या कंपनीला आग लागल्याचे दिसताच तातडीने अग्निशमन दलाला फोन केला आणि स्वतः पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

शादाब मुलाणी म्हणाले की, मित्रांसह सासवड रस्त्याने मंतरवाडीकडे जात होतो, त्यावेळी लिप्टन चहाच्या कंपनीतून धूर येत असल्याचे दिसले. तातडीने गाडी बाजूला घेऊन फायर सिलिंडर घेऊन कंपनीतील आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. तसेच इतरांनी तेथील पाईपने पाणी मारण्यास सुरुवात केली. दरम्यान अग्नीशमन दलाला फोन करून माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान 15 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.