Exit Poll 2019 : ‘भाऊ-दादा’ लढतीत गिरीशभाऊंची १ लाखाहून अधिक मतांनी ‘सरशी’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पुणे लोकसभा मतदार संघात भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यामध्ये दुरंगी सामना झाला. सन 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पुण्यात जाहिर सभा घेतल्या होत्या. मात्र, यंदा पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहिर सभा पुणे शहर आणि जिल्हयात झाली नाही. सुरवातीपासुनच एकतर्फी समजली जाणारी पुण्याची निवडणूक केवळ चर्चेसाठी काहीदिवस अटीतटीची झाली मात्र मतदान झाल्यापासुन आज पर्यंत मतदार संघातील मतदार गिरीश बापट हे किमान एक लाख मतांनी निवडून येतील अशी चर्चा करीत आहेत.

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना भाजपची उमेदवारी जाहिर झाली आणि तेव्हापासुन बापट आणि त्यांचे कार्यकर्ते कामाला लागला. काँग्रेस पक्षाने पुण्यातील उमेदवारी जाहिर करण्यास प्रचंड विलंब केला. सुरवातीला काँग्रेसकडून प्रविण गायकवाड यांच्या नावाची चर्चा झाली मात्र नंतर निष्ठावंतांनी अधिक जोर लावण्याने गायकवाड यांचा उमेदवारीचा पत्‍ता कट झाला. शेवटच्या क्षणी काँग्रेसने उमेदवारीची माळ मोहन जोशी यांच्या गळयात टाकली. निष्ठावंत असलेले मोहन जोशी यांनी प्रचाराला सुरवात केली. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार करण्यात आला. पण, मतदारांचा कल भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्याच बाजुने अधिक दिसला. वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोनमेन्ट आणि कसबा मतदार संघातून गिरीश बापट यांना अतिशय उत्‍तम प्रतिसाद भेटला. एवढेच नव्हे तर शिवसेना, रिपाई आणि इतर मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजप उमेदवार गिरीश बापट यांचा ठासुन प्रचार केला. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी उत्‍तम साथ दिली.

काहीसे भाजपविरोधी वातावरण असताना देखील काँग्रेसला पुण्यात त्याचा अजिबात फायदा घेता आला नाही. भाजपची प्रचार यंत्रणा आणि मित्र पक्षांनी दिलेल्या उत्‍तम साथीने गिरीश बापट यांनी प्रचारात शेवटच्या टप्प्यात चांगलीच आघाडी घेतली. भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी देखील सक्रिय प्रचार केला. घरोघरी जावुन कमळ फुलवा असे सांगण्यात आले. दुसर्‍या बाजुला काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते प्रचारात सक्रिय सहभागी होत होते. अभाव होता तो केवळ तळागाळातील कार्यकर्त्यांचा. मतदान शांततेत पार पडले. त्यानंतर चर्चा सुरू झाल्या. गिरीश बापट निवडुन येणार हे तर सर्वश्रुत होते. आता मात्र गिरीश बापट हे किमान एक लाखहून अधिक मतांनी निवडून येतील अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे.

कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि पर्वती मतदार संघातुन गिरीश बापट यांना भरघोस लीड भेटेल तर पुणे कॅन्टोनमेन्ट मतदार संघात सामना बरोबरीत सुटेल असे भाकीत काही जाणकारांनी केले आहे. पुणे लोकसभा मतदार संघात येणार्‍या सर्वच विधानसभा मतदार संघातील चर्चेचा आढावा घेतला असता सर्व ठिकाणाहून गिरीश बापट हे किमान एक लाखहून अधिक मतांनी निवडून येतील असे सांगण्यात येत आहे. दि. 23 मे रोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर होणार आहे. त्याचदिवशी गिरीश बापट नेमक्या किती मतांनी विजयी होणार हे समजेल. मात्र, पुणे लोकसभा मतदार संघातून गिरीश बापट यांचीच ‘सरशी’ होणार हे निश्‍चित !