Pune : लॉकडाऊनच्या विकेंडला हडपसरमध्ये ‘सन्नाटा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या तिसऱ्या विकेंडला हडपसरमधील मुख्य बाजारपेठ कडकडित बंद होती. भल्या सकाळी रस्त्यावर किरकोळ भाजीविक्रेते वगळता सर्वत्र सन्नाटा होता. पोलिसांची व्हॅन फिरताच भाजीवाल्यांनीही घर गाठले. नागरिकांनीही आता घरात थांबणेच पसंत केले आहे. हॉस्पिटलमध्ये किंवा औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची दुचाकींची संख्या जास्त होती. त्याशिवाय मोठ्या वाहनांची वर्दळही कमी झाली होती. शाळा-महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त दरवर्षी भरगच्च कार्यक्रम असतात. संस्था आणि संघटनांकडूनही महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम घेतले जातात. मात्र, मागिल वर्षापासून कोरोनाने सर्वच कार्यक्रमांना ब्रेक लावला आहे. यावर्षीही सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट दिसत होता.

महाराष्ट्र दिन साजरा करीत शाळा-महाविद्यालयांमधील मुलांचे कौतुकही केले जात होते. चिमुकल्यांचे बोबडे बोल ऐकण्याची संधी मागिल दोन वर्षांपासून चुकत असल्याची हुरहूर मनाला चटका लावत आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे, आमच्या शाळा सुरू होऊ दे अशी आर्त हाक चिमुकल्यांकडून आज दिली जात आहे. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर दिवसभर सुरू होता. संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या ताकदीनं लढवला त्याच ताकदीनं आज ‘कोरोना’ विरुद्ध लढू आणि जिंकू, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरुन संघर्ष केला. आता प्रत्येकाने कोरोनाला हरविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळत स्वतःबरोबर इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असा निश्चय करण्याची वेळ आहे, असा सूचक इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

हडपसर गांधी चौकातील मजूर अड्ड्यावर मागिल महिन्यात मजुरांची संख्या वाढत होती. मात्र, काही दिवसांपासून मजूर अड्डाही मजुरांविना ओस पडू लागला आहे. रोजगार मिळतच नाही, तर येथे यायचे तरी कशाला अशी मानसिकता त्यांची तयार झाली आहे. काल-परवापर्यंत 100-150 मजूर येथे थांबत होते. त्या ठिकाणी आज अवघे 30-40 मजूर होते. त्यांनीही दुपारनंतर घर गाठले. शासनाकडून आम्हाला फुकट काही नको, हाताला काम द्या आणि काम करून रोजगार मिळवू, अशी आर्त हाक या मंडळींकडून शासनाकडे केली जात आहे.

मागिल काही दिवसांपासून बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड आणि रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांची पुरे वाट लागली आहे. शासकीय हॉस्पिटलसह खासगी हॉस्पिटलसमोर आता हाऊसफुल्लचा फलक लागल्याचे पाहायला मिळत आहे. मागिल वर्षापर्यंत खासगी हॉस्पिटलची मार्केटिंग टिम रुग्ण मिळविण्यासाठी काम करीत होती. मात्र, आता नागरिकांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जागा मिळविण्यासाठी मनधरणी करावी लागत आहे. एवढ्यावर थांबून चालत नाही, तर चक्क नगरसेवक, आमदार, खासदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून खासगी हॉस्पिटलमध्ये जागा मिळवून द्या, असे सांगावे लागत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीही उपचार करण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. मात्र, रुग्ण कमी होताना दिसत नाही. दररोज रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफवर मोठा ताणतणाव येऊ लागल्याचे हॉस्पिटलकडून सांगितले जात आहे.