Pune : कोंढव्यात एकाच इमारतीमधील 5 फ्लॅट चोरट्यांनी फोडले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोंढव्यात घरफोड्या करणारे चोरटे हैदोस घालत असून, एकाच इमारती घुसून 5 फ्लॅट फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यात एका फ्लॅटमधून 25 हजारांचा ऐवज गेला असून, उर्वरित 4 फ्लॅटचे मालक नसल्याने नेमका किती माल गेला हे समजू शकलेले नाही.

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात प्रशांत कुतवळ (वय 33) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी येथील इस्कॉन मंदिराशेजारी असलेल्या प्रतिभा हाऊसिंग सोसायटी येथे राहण्यास आहेत. बुधवारी रात्री ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच घरातील 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यासोबतच त्यांच्याच इमारतीमधील बंद असलेले 204, 302, 202 व 304 हे फ्लॅट देखील फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र फ्लॅट धारक नसल्याने नेमका किती माल गेला हे समजू शकलेले नाही. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पाहणी करत परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.