Pune : गेल्या 10 महिन्यांत पोलिसांनी बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या 52 जणांना पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्याची ओळख आता पिस्तूलबाजांचे शहर अशीही होऊ लागली असून, गेल्या दहा महिन्यांत पोलिसांनी बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या 52 जणांना पकडले आहे. त्यांच्याकडून 59 पिस्तूल आणि 108 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

सांस्कृतिक शहरात आज संघटीत गुन्हेगारी अन् पैसा, जमीन तर कधी केवळ चोरी करण्यासाठी मुडदे पाडले जात आहेत. टोळ्यांचा धुडगूस वरकरणी थांबला असल्याचे दिसत असले तरी तो कधी भडकेल हे सांगता येत नाही. शहरात बिल्डरांच्या हत्या थेट गोळ्या झाडून होऊ लागल्या आहेत. नवीन भाई उदयाला येऊ लागले आहेत. पोलीस सराईत गुन्हेगारांवर मोक्का, तडपारी, एमपीआयडी कायद्यान्वये लगाम घालत आहेत. पण त्यानंतरही शहरात पिस्तूलबाजांचा सुळसुळाट अशीच म्हणण्यांची वेळ आली आहे. कारण, पोलिसांनी गेल्या दहा महिन्यांत केलेल्या कारवाईत दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर शहरात गुन्हेगार पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शहरात अशी परिस्थिती असताना एका महिन्यात पोलिसांनी बेकायदेशीर पिस्तूल बाळगणार्‍या 9 जणांना पकडले आहे, तर त्यांच्याकडून 9 पिस्तुले जप्त करत 15 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तसेच गेल्या दहा महिन्यांत 52 जणांना पकडले गेले आहे. त्यांच्याकडून 59 पिस्तूल व 108 काडतुसे पकडण्यात आली आहेत.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक पंधरकर व त्यांच्या पथकास मंगळवारी खराडी गाव ते दर्गा रोड बाप्पू ढाब्याच्या जवळ खराडी येथे दोन जण पिस्तुलासह येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून समाधान लिंगप्पा विभुते (28, रा. केसनंद रोड, वाघोली) आणि गोपाल रमेश मुजमुले (21, खांदवेनगर) येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून पथकाने दोन गावठी पिस्तूल, एक गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.