पोलिसांचा कमी अन् पोलिस मित्रांचाच त्रास अधिक ?

पोलिसनामा ऑनलाइन  –  लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंदचे वातावरण आहे. त्यात घराबाहेर पडायचे म्हणजे पोलिसांच्या कटकटी बंद झाल्या. मात्र, पोलीस मित्रांचा त्रास वाढल्याने नागरिक कमालीचे त्रासले आहेत. फुकट फौजदारच लय झालेत. त्यामुळे पोलीस परवडले राव, असे म्हणायची वेळ आली आहे. दरम्यान, पोलीस आणि नागरिकांमधील वाद काहीसा थांबल्याचे चित्र दिसत आहे.

उपनगर आणि परिसरातील मुख्य रस्त्यावर, चौकातून घराबाहेर पडणाऱ्यांना ‘भाऊ, कोण तुम्ही?’, ‘काय काम आहे?’, अस प्रश्न थेट पोलीस मित्र विचारू लागले आहेत. नेहमीच्या पोलिसांशी असलेली ओळखही आता कामाला येत नसल्याचे बाब काही ठिकाणी दिसू लागली आहे. त्यामुळे वर्दीतल्या पोलिसाने चौकशी केल्यावर राग येऊन होणारे वादही टळत आहेत. साध्या वेशातल्या पोलिस मित्रांकडून होणाऱ्या चौकशीला नागरिक निमूटपणे सामोरे जात आहेत. यामुळे नागरिकांमध्येही धास्ती वाढली असून, लांबूनच नाकाबंदी पाहून पुन्हा आल्या पावली परत जाताना दिसत आहेत.

देशभरात ‘लॉकडाऊन’ झाल्यानंतर पोलिसांनी शहरात केलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिस मित्रांची नेमणूक केली आहे. यामुळे पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवरील ताण हलका झाला असून, स्थानिक ‘भाऊ, दादा’ यांचा त्रास थांबला आहे. उपनगरातील प्रत्येक चौकात नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे. ‘तुमचे ओळखपत्र दाखवा, अत्यावश्यक सेवेत नाहीत, मग घराबाहेर का निघालात’, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. पहिल्यांदाच चौकशीसाठी समोर आलेल्या या पोलिसमित्रांशी कोणीही हुज्जत घालत नाहीत. पोलिस कर्मचारी लांब उभे राहत असल्याने पोलिसांशी होणारे वादही थांबले आहेत. ज्या कामासाठी निघाले, ते कारण सांगून नागरिक पुढे जात आहेत. यामुळे उपनगरात चौकांमध्ये सतत फिरणाऱ्या टवाळखोरांनाही या पोलिस मित्रांनी चांगलेच धारेवर धरले आहे. त्यामुळे सतत चौकशीला सामोरे जाण्यापेक्षा चौकात न जाणेच अनेकजण टाळत आहेत. यामुळे चौकातील अनावश्यक वर्दळ घटण्यास मदत झाल्याचे चित्र शहरात दिसते आहे.

…..तरीही, एकटेच या रे!

विशेष म्हणजे, पोलिसांनी अडविल्यास काही ठराविक कारणे चर्चेचा विषय बनली आहे. प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी सारखीच कारणे ऐकायला मिळत आहेत. यामध्ये चार जण एकत्र असल्यास ‘दादा, तुमच्यासाठीच चहा आणलाय’, ‘अहो, मदतीला जातोय’ असे सांगत आहेत. यांनाही पोलिसांचा दणका बसत असून, ‘मदत करा, पण चौघे नको. एकटेच या रे’, असे पोलिस सांगत आहेत.

काहीही फंडे वापरतात

भाजी, किराणा घ्यायला जातोय, अहो, तिकडच्या दुकानात साखरच नव्हती, मेडिकलमध्ये जात आहे, त्या मेडिकमध्ये हे औषध नाही, डबा द्यायचा होता, मी बाहेरगावचा आहे, आजीकडे जेवायला गेलेलो, तुम्हालाच चहा द्यायला आलोय, अशी एक ना अनेक बहाणे घराबाहेर पडण्यासाठी नागरिकांकडून शोधले जात आहेत.