लक्ष्मी रस्त्यावरील व्यापारी चंदन शेवानी खून प्रकरणातील मुख्य सुत्रधारास अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन  – शूज व्यापारी चंदन शेवानी खून प्रकरणातला मुख्यसूत्रधार परवेझ हनीफ शेख याला गुन्हे शाखेने सातारा जिल्ह्यातून अटक केली. यावेळी त्याच्याकडून 3 पिस्तुल आणि 40 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान फरारी काळात तो सातारा, सांगली येथील नागरिकांना खंडणी मागत असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने त्याला 25 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

शेख हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीचे 18 गुन्हे दाखल आहेत. तर एका गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली आहे. चंदन शेवानी यांचे 2 कोटी रुपयांसाठी अपहरणकरून त्यांचा सातारा जिल्ह्यात खून करण्यात आला होता. त्यांनतर त्याच्या साथीदाराना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, परवेझ हा पसार झाला होता. दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनचे उपनिरीक्षक प्रताप शेळके यांना माहिती मिळाली की, परवेझ हा माहुली गावात येणार आहे.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, जयंत जाधव व त्यांच्या पथकातील यशवंत खंदारे, कादिर शेख यांनी तब्बल 26 तास सापळा रचून त्याला अटक केली. शेवानी यांचा खून केल्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. यापुर्वी गुन्हे शाखेने किरण कदम, आफ्रीदी खान, सुनिल गायकवाड, अजिंक्य धुमाळ या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 3 पिस्तुल आणि 40 काडतुसे तर यापूर्वीच 2 पिस्तुल आणि 12 काडतुसे असा एकूण 5 पिस्तुल आणि 52 काडतुसे असा शस्त्रसाठा पकडला आहे.

घटनेच्या 15 दिवस आशिपासून त्यांनी चंदन शेवानी यांची दिनचर्याबाबत माहिती घेत होते. शेवानी यांच्या दुकानातील कामगार सुनील गायकवाड हा त्यांना माहिती पुरवत होता. 2 कोटीमधील 25 टक्के रक्कम त्याला देण्याचे ठरले होते. तर उर्वरीत रक्कम इतर आरोपी घेणार होते. अपहरण करताना दिवसभर रेकी केल्यानंतर रात्री चंदन शेवानी हे त्यांच्या कारमधून खाली उतरताच त्यांना कारमध्ये ढकलून त्यांचे अपहरण केले होते.