मनसे सैनिक गेले धडा शिकवायला परंतु घडले असे काही…..

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधात लिहिणाऱ्यांना घरी जाऊन अद्दल घडवण्याचे आदेश मनसेच्या १३व्या वर्धापनदिन कार्यक्रमात कार्यकर्त्यांना दिले होते. राज ठाकरेंशी संबंधित बातमीवर आक्षेपार्ह कमेंटमुळे अद्द्ल घडविण्यासाठी मनसेचे पुण्यातील कार्यकर्ते एकाच्या घरी गेले. मात्र त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समजले. आणि त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली. आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्याला समज देऊन पोलिसांनी सोडले.

हडपसर भागात राहणाऱ्या विभास जाधव याने राज ठाकरे यांच्याशी संबंधित बातमीवर आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्याबाबत मनसे कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मनसेचे पुणे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह इतर कार्यकर्ते बुधवारी जाधव याच्या घरी गेले. तेव्हा जाधव हे घरी नसल्याचे सांगण्यात आले. जाधव यांच्या नातेवाईकांसोबत कार्यकर्त्यांचा वाद झाल्याने हा वाद चांगलाच वाढला. त्यामुळे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. त्यानतंर पोलिसांनी मध्यस्थी करून जाधव याला पोलीस स्टेशनला बोलावून घेतले.त्यानंतर जाधव याने यापूर्वीही असा प्रकार करत राजकीय व्यक्तींपासून ते पोलीस प्रशासनातील व्यक्तींवरही आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे त्याला पोलिसांनी १४९ नुसार पुन्हा असा प्रकार न करण्याची सूचना देऊन सोडले.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे म्हणाले की, जाधव विकृत मनोवृत्तीचा असून यापूर्वीही त्याने जवळचे नातेवाईक आणि इतर राजकीय व्यक्तींबाबत असाच प्रकार केला होता. त्याच्याकडून ही पोस्ट डिलीट करून घेतली. पुन्हा अशी कृती घडल्यास कारवाई करण्यात येईल अशी ताकीद देऊन सोडण्यात आले आहे.

तर राज ठाकरे मनसैनिकांचे दैवत आहेत. टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु संविधानिक भाषेचा वापर करून ती केलेली असावी. अश्लील टिका आम्ही खपवून घेणार नाही.  आम्ही महिलांशी सन्मानाने आणि संयमाने बोलण्याचा प्रयत्न केला. असे वसंत मोरे म्हणाले.

जाधवचे खरेच मानसिक संतुलन बिघडलेले आहे का तसे असल्यास त्याचे कुटुंबिय त्याची बाजू का घेत होते. असा सवाल मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केला.