हडपसरला जेष्ठ नागरिकाचा डोक्यात दगड घालून खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – हडपसर परिसरात फुरसुंगीत दशक्रिया विधीच्या ठिकाणीच एका नागरिकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. खूनाचे कारण समजू शकलेले नसून, अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे.

नरसिंह विठलं गव्हाणे (वय 55) असे खून झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नरसिंह यांच्या मुलाने तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी परिसरात नरसिंह हे त्यांच्या दोन मुलांसोबत राहत होते. दरम्यान, त्यांना अधून-मधून दारू पिण्याचे व्यसन होते. दुकानातून दारूची बाटली घेऊन ते कधी मित्रांसोबत तर कधी एकटेच स्मशानभुमी परिसरात दारू पिण्यास बसत असत.

रात्रीही ते दारू पिण्यासाठी तिकडे गेले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्मशानभूमी जवळ दशक्रिया विधी करण्यासाठीची जागा आहे. परंतु, रात्री याठिकाणी आलेले तरूण याठिकाणी थुंकतात तसेच घाण करतात. दरम्यान, नरसिंह हे रविवारी रात्री त्याठिकाणी गेल्यानंतर येथे आलेल्या काही तरुणांना त्यांनी येथे का थुंकता तसेच घाण करता, असा जाब विचारला होता, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यातूनच नरसिंह यांचा खून झाला असण्याची शक्यात पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी त्या तरुणांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/