नऱ्हे : मुंबई-बंगळुरू महामार्गावर अपघात, चालकाचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – उभारलेल्या कारला पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथे हा अपघात झाला.

आप्पा विजय खांडेकर (वय २९, रा. लोणार खडकी, ता. माण सातारा) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई राहूल शिंदे यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून साताराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नऱ्हे येथील भूमकर पुलाजवळ कारचा टायर फुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभी केली होती. ट्रक चालक खांडेकर याने गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास भरधाव ट्रक चालवित आणला. त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो ट्रक रस्त्याच्याकडेला उभ्या केलेल्या कारवर पाठीमागून जाऊन धडकला. यामध्ये दोन्ही मोटारीचे मोठे नुकसान झाले. तसचे, चालक असलेला खांडेकर हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास व्ही. एस. धोत्रे हे करत आहेत.