Pune News : 24 तास ! एकच टोळी 3 गंभीर गुन्हे; गँगस्टर आत गेले पण गल्ली-बोळातल्या भाईंचा ‘उन्माद’; पोलीसही हैराण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कुख्यात गुन्हेगारांना पुणे पोलीस दणकेबाज कारवाई करून कारागृहात पाठवत असले तरी शहरात गल्ली-बोळात निर्माण झालेल्या “भाईं”च्या उद्योगांमुळे मात्र पोलीस बेजार झाले असून, भारती विद्यापीठ परिसरात टोळक्याने २४ तासात ३ गंभीर गुन्हे करत नाकीनऊ आणले आहे. धक्कादायक म्हणजे यात ४ अल्पवयीन मुले असून, डोंगरात ही टोळी असल्याचे समजताच तेथे धडक मारलेल्या पोलिसांच्या हाती दोघे सापडले. पण ४ अल्पवयीन पसार होण्यात यशस्वी झाले. यामुळे मोठ्यांना वठणीवर आणलं, पण गल्ली-बोळात दहशत माजवणाऱ्या भाईंचा बंदोबस्त कसा करायचा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अजय ऊर्फ रवींद्र शुभम हिरे (वय २०) व विशाल शिवाजी शेळके (वय २०) या दोघांना अटक केली आहे, तर त्यांच्या अल्पवयीन साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भादंवि कलम ३०७, आर्म अ‍ॅक्ट तसेच इतर कलमान्वये एक गुन्हा दाखल केला आहे, तर भादंवि कलम ३९७, आर्म अ‍ॅक्टसह दुसरा गुन्हा व ३६५, ३२४ आणि इतर कलमान्वये तिसरा गुन्हा दाखल केला आहे. यात फिर्यादी वेगवेगळे आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, शेळके याचे पोलीस रेकॉर्ड आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. दरम्यान, शेळके व त्याच्या साथीदारांनी रात्री एकाला त्याच्या आईने तक्रार दिली असल्याच्या रागातून तो काम करत असलेल्या बेलदरे पेट्राेल पंपावर जाऊन मारहाण केली, तर त्याला तक्रार मागे घे असे म्हणत पेट्रोल पंपावर तुफान राडा घालत एका रिक्षाची तोडफोड केली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. यामुळे काही काळ पेट्रोल पंप परिसरात तणाव निर्माण झाला होता. आलेले ग्राहक भीतीने पळाले होते.

हा गुन्हा घडल्यानंतर आरोपींनी आंबेगाव बुद्रुक परिसर येथे जात भिंताडेनगरला एका भाजी विक्रेत्या तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्याजवळील १६ हजाराची रोकड, तसेच पाकीट जबरदस्तीने हिसकावून नेले. हा प्रकार सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळीच घडला. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. टोळके पसार झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भारती विद्यापीठ पोलिसांनी येथे धाव घेतली. तिसऱ्या घटनेत टोळक्याने तरुणीला बोलत असल्याच्या रागातून एका १६ वर्षीय मुलाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून डोंगर भागात नेले आणि त्याला बेदम मारहाण केली. त्याला मारहाण करून टोळक्यांनी सोडून दिले.

भारती विद्यापीठ पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास वेगात करत आरोपींचे लोकेशन काढत त्यांना डोंगर भागात पकडले. यावेळी दोघे सापडले व यानंतर दोन अल्पवयीन मुलांना पकडले आहे, तर इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.

दरम्यान, २४ तासात एकाच टोळक्याने ३ गंभीर गुन्हे करत परिसर दणाणून सोडल्याने पोलीसदेखील हैराण झाले आहेत. एकीकडे गँगस्टरला लगाम घातला जात असताना या गल्ली-बोळातल्या भाईंनी मात्र परिसर अशांत केला आहे. त्याचा त्रास पोलीस अन पुणेकरांनादेखील होत आहे.