Pune News : टेम्पो चालकाला लुटून 6 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गॅसच्या टेम्पोचालकाला दमदाटी करून मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन सहा महिन्यांपासून फरारी आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना सहा महिन्यांपूर्वी घडली होती.

विशाल नानासाहेब आव्हाड (वय 21, रा. आनंदनगर, तरवडेवस्ती, महंमदवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी श्रवण हुकुमाराम बिष्णोई यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये 12 जुलै 2020 रोजी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी श्रवण हुकुमाराम बिष्णोई रामटेकडी परिसरात गॅसचा टेम्पो घेऊन चालले होते. त्यावेळी आरोपीने टेम्पोला ॲक्टिवा आडवी मारून शिवीगाळ करत दमदाटी करून मोबाईल खिशातील रोख रक्कम घेऊन फरार झाला होता. सहायक फौजदार प्रदीप गुरव यांना सदर आरोपी वाडकर मळा (सय्यदनगर) येथे थांबला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार गुरव यांनी घटनास्थळी धाव घेऊन ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबुल केला.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे, सहायक फौजदार प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, ज्ञानदेव गिरमकर, शिरीष गोसावी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.