Pune News : नांदेडच्या पोलीस उपनिरीक्षकाचा पुण्यात ‘डर्टी पिक्चर’, महिला पोलीसाची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार, बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – नांदेड पोलीस दलातील उपनिरीक्षकाने पुण्यातील एका महिला शिपायाला लग्न करण्याचे आमिष दाखवत जवळीक साधली. तर कर्ज असल्याचे सांगून 5 लाख आणि 9 तोळे दागिने घेऊन ते परत न करता फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी उपनिरीक्षक रहीम बशीर चौधरी (वय 30, रा. लातूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला शिपायाने तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला शिपाई पुणे पोलीस दलात नोकरीस आहे. तर उपनिरीक्षक रहीम हा पूर्वी पोलीस कॉन्स्टेबल होता. परंतु, खात्या अंतर्गत परीक्षेत तो उपनिरीक्षक झाला. सध्या तो नांदेड पोलीस दलात नेमणुकीस आहे. त्याची नेमणूक नांदेड कंट्रोलला आहे.

रहीम हा पुणे पोलीस दलात असताना महिला पोलीस शिपाई यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी त्याने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढवली. तसेच त्यांना लग्न करायचे असल्याचे सांगत जवळीक वाढवण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. तसेच मुलगा असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने मुलाची जबाबदारी घेतो असे सांगितले व जवळीकता वाढवली. यानंतर फिर्यादी यांनी लग्नसाठी तगादा लावला असता त्याने नोव्हेंबर महिन्यात नांदेड येथे साखरपुडा केला. पण नंतर लग्नाला नकार दिला. मात्र, मी लग्न तुझ्याशीच करणार असल्याचे सांगत विश्वास संपादन करून त्याने बहिणीच्या लग्नाला कर्ज घेतले होते, त्यासाठी पैश्यांची आवश्यकता आहे, असे सांगून 5 लाख रुपये फिर्यादी कडून घेतले. तर नंतर पुन्हा घराचे बांधकाम सुरू करायचे असल्याचे सांगत 9 तोळे दागिने घेऊन ते परत न करता तसेच लग्न न करता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जाची चौकशी केली असता त्याच्यावर बलात्कार आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.