Pune News : पुणे-नगर महामार्गावरील लोणीकंद परिसरात सराईत गुन्हेगार सचिन शिंदेवर भरदुपारी गोळीबार, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लोणीकंद परिसरातील सराईत गुन्हेगारावर भरदुपारी दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गोळी डोक्यात लागल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

सचिन शिंदे (वय 29, रा. लोणीकंद) असे जखमी झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शिंदे हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह इतर गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास थेयुर फाटा येथे उभा होता. त्यावेळी ऍक्टिव्हा दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळी झाडली. त्यात त्याच्या डोक्यात गोळी लागली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लोणीकंद परिसरात या गोळीबाराने खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने धाव घेत तपासला सुरुवात केली आहे. गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.