Pune News : मामलेदार कचेरीत चोरी करण्याचा प्रयत्न, 2 फ्लॅट फोडत 5.5 लाखांचा माल लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात बंद फ्लॅट अन दुकाने फोडण्याचे प्रकार घडत असताना आता मामलेदार कचेरीत चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दोन फ्लॅट फोडत साडे पाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी खडक पोलीस (Khadak Police) ठाण्यात प्रमोद घाडगे (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद हे शासकीय नोकर असून, ते मामलेदार कचेरी येथे नगर भूमापन अधिकारी आहेत. यादरम्यान कार्यलय बंद असताना अज्ञातांनी कार्यालयाचे अभिलेख कक्षाचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच कॉम्प्टकरचा दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.

तर हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद फ्लॅट फोडून 4 लाख 97 हजार रुपयांची ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सीमा रोकडे (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे. रोकडे यांचे दिर विजय रोकडे हे मांजरी भागात राहतात. त्यावेळी चोरट्यांनी घराचा कडी कोयडा उचकटून आत प्रवेश केला. तसेच घरातील कपाटातून दागिने व रोकड असा 4 लाख 97 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. तसेच सिंहगड रोड येथे घराचे सेफ्टी डोअर तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी अमेरिकेन डॉलर आणि इतर असा 45 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी राहुल तिवारी (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला आलेल्या एकाचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना वानवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी 60 वर्षीय विनोद सोलखी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद हे लुल्लानगर परिसरात राहतात. ते सकाळी त्यांच्या कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला कोंढवा बिबवेवाडी रस्त्यावर आले होते. ते कॅफे कॉफी डे समोर आल्यानंतर भरधाव दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील 20 हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला आहे. त्यांनी आरडाओरडा केला मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.