Pune News : बिल्डरला पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी; फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष सावंतसह कंपनीच्या संचालकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शुभ ट्रेड बीज इंडिया लिमिटेड या बड्या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यानंतर सोने आणि फोर व्हिलर देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला फसविल्या प्रकरणी शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी संतोष सावंत आणि कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकास पिस्तुल दाखवत धमकावले तर पोलीस कर्मचारी सावंत यांनी पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे. या गुन्ह्याने शहर पोलीस दलात खळबळ माजली आहे.

याप्रकरणी निखिल मिरगे (वय 29, रा. नांदेडसिटी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अभिजित धोंडिबा सावंत, शुभ ट्रेड बीज इंडिया लिमिटेड लायबलिटी पार्टनरशिप कंपनीचे संचालक व पोलीस कर्मचारी संतोष सावंत यांच्यावर 406, 417, 419, 120 (ब), 506 (2), 34 सह आर्म ऍक्ट क 3 (25) यासह महाराष्ट्र राज्यातील गुंतवणूक दरांचे हित संबधाचे सरंक्षण अधिनियम यासह इतर कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. यातील सर्व आरोपींनी आपआपसात संगनमत व कट रचून त्यांच्या शुभ ट्रेड बीज कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास महिन्याला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. त्यात दुचाकी, कार, सोने यासारखी बक्षीस देऊ असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. तर विश्वास बसवा यासाठी वृत्तपत्र, युट्युब, फेसबुक यासारख्या माध्यमातून जाहिरात केली. त्यानंतर फिर्यादी यांना 63 लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यातले परतावा म्हणून 3 लाख 78 हजार रुपये परत दिले. पण नंतर पैसे दिले नाही. फिर्यादी गेले असता त्यांना पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर यानंतर पोलीस कर्मचारी संतोष सावंत याने फिर्यादी यांच्या दाजीला बोलवून घेत शिवीगाळ करत पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत त्यांच्या मर्सिडीजची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार जुलै 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडला आहे.