Pune News : कोर्टामध्ये जामिनासाठी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 24 जणांवर FIR तर 13 जणांना अटक ! प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – न्यायालयात जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळ्यांचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला असून, तब्बल 24 जणांवर गुन्हा दाखल केला आहे तर त्यातील 13 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईने न्यायालय, वकील, गुन्हेगार आणि पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. वेगवेगळे 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई झाली आहे.

लष्कर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप साखरे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी निलेशकुमार नंदकुमार शहाने (वय 27, मनपा शाळेजवळ, दत्तवाडी), महारुद्र मोहन मंदरे (वय 26, माणिकबाग), असिफ ताहीर शेख (वय 27, कात्रज), मोहसीन बाबू सयद (वय 48, रा. निगडी), रशिद अब्दुल सय्यद (वय 49, रा. शांतीनगर), अमीर नूरमहम्मद मुलाणी (वय 44, चिंचवड) अशी एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर दुसऱ्या गुन्ह्यात विमानतळ पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक संगीता काळे यांच्या तक्रारीवरून नागेश माणिक बनसोडे (वय 39, पिंपरी) याला अटक केली आहे. तसेच तिसऱ्या गुन्ह्यात खडक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रतीकांत कोळी यांच्या तक्रारीनुसार 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात कोणाला पकडलेले नाही. तर कोंढवा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमेश कदम यांच्या तक्रारीवर भावेश विजय शिंदे (वय 33), विक्की विद्यासागर पुडगे (वय 28), कल्पेश सीताराम इंगोले (वय 18), सोनू अशोक जगधने (वय 29), शशांक प्रकाश साळवी (वय 31), शुभम ज्ञानोबा लांडगे (वय 18) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतरांचा शोध सुरू आहे.

आरोपी नेमकं काय करत होते

शिवाजीनगर, लष्कर, वडगाव यासह वेगवेगळ्या न्यायालयात चोरी, जबरी चोरी, घरफोड्या, दरोडा आणि पॉस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून ते सादर करत असे. यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, आणि सातबारा उतारे हे बनावट तयार केली जात. ती जामिनासाठी न्यायालयात सादर केली जात. तर काही प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर तारखेला न्यायालयात हजर राहणार नाहीत, अश्याना एजंटमार्फत बोगस जमीनदार मिळवून देत. यात न्यायालयाची दिशाभूल तर होत असतच पण त्यामुळे गुन्हेगारांचे फावत होते. यामुळे पोलिसांनाच याचा त्रास सहन करावा लागत. कारण, बहुतांश हे सराईत आणि घरफोडी, चोऱ्या करणारे आरोपी असत. जे एकदा जामीन भेटला की नंतर ते कधीच न्यायालयात तर येत नसत. पोलिसांच्या देखील हाती लागत नव्हते. त्यांची गुन्हेगारी कृत्ये मात्र सुरूच राहत होते.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी नवीन आलेले उपनिरीक्षक आणि प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. त्यांना यावर योग्य मार्गदर्शन केल्यानंतर अचानक छापेमारी करत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई झाली आहे. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. तर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात झालेल्या या कारवाईने प्रचंड खळबळ उडाली आहे.