एल्गारची कागदपत्र घेण्यासाठी NIA चे पथक आयुक्तालयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार परिषद व माओवादी गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे(एनआयए) गेल्यानंतर एनआयएचे अधिकारी गुन्ह्याची कागदपत्रे घेण्यास पुणे पोलिस आयुक्तालयात सोमवारी दाखल झाले. गुन्ह्याच्या तपासाबाबत येथील तपासी अधिकाऱ्यांकडून एनआयएच्या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. या गुन्ह्याचा तपास एनआयएकडे देण्यास राज्य सरकार व कोर्टाने परवानगी दिली आहे.

केंद्र शासनाने एल्गार परिषद गुन्ह्याचा तपास एनआयएकडे दिला आहे. त्याला राज्य शासनाने विरोध केल्यानंतर एनआयएने शिवाजीनगर येथील कोर्टात धाव घेऊन गुन्ह्याचा तपास मुंबईतील एनआयएच्या विशेष कोर्टात वर्ग करण्यासाठी अर्ज केला होता. त्याला सुरूवातील राज्य सरकारच्या वतीने विरोध करण्यात आला होता. पण, नंतर राज्य सरकारने देखील हा गुन्हा वर्ग करण्यास परवानगी दिली. त्यानंतर कोर्टाने देखील हा गुन्हा मुंबईच्या कोर्टात वर्ग करण्यास परवानगी दिली होती.

त्यानंतर एनआयएचे सहा ते सात अधिकाऱ्यांचे पथक या गुन्ह्याची कागदपत्र घेण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयामध्ये दाखल झाले. त्यांनी तपास अधिकाऱ्यांकडून गुन्ह्याची थोडक्यात माहिती घेतली आहे. या गुन्ह्याची कागदपत्रं बरीच असल्यामुळे कागदपत्रं ताब्यात घेण्याची प्रकिया आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान एल्गारच्या गुन्ह्याचा तपास एनआयएकडे दिला असला तरी राज्य सरकारकडून या गुन्ह्याच्या समांतर तपासासाठी एसआयटी नेमण्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

You might also like