Pune News : थरार ! चोरट्यांना पाहून पळ काढणाऱ्या ‘त्या’ प्रकरणातील आरोपी दुधानीला पाठलाग करून पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   चोरट्यांना पाहून पळ काढणाऱ्या ‘त्या’ प्रकरणात अखेर पोलिसांना एका कुविख्यात गुन्हेगाराला आज (शनिवार) थरारक रित्या पकडण्यात यश आले आहे. पोलिसच चोरट्यांना पाहून पळून गेल्यानंतर पुणे पोलिसांबद्दल ‘चांगली’च चर्चा झाली होती. त्यामुळे ही टोळी पकडणे पोलिसांसाठी आव्हान होते.

याप्रकरणी पोलिसांनी बिरजूसिंग रजपुतसिंग दुधानी (वय 37) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी औंध परिसरात एका सोसायटीत चार ते पाच चोरटे शिरले असल्याचे माहिती मिळाली होती. यावेळी रात्र गस्तीवर असलेले कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी मात्र चोरटे गेटमधून बाहेर येत असताना पोलीस समोरून पळाले. यावेळी चोरट्यांचा हातात हत्यारे होती. पोलिसांनी त्यांना पकडण्याऐवजी त्यांना पाहून पळ काढला होता. हे प्रकरण उजेडात आले आणि सीसीटीव्हीत हा सर्व प्रकार कैद झाल्यानंतर शहरात हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. पुणे पोलिसांची मात्र यामुळे प्रतिमा मलिन झाली होती. यामुळे हे चोरटे पकडणे पोलीसासांठी आव्हान होते. यावेळी दुधानी हा रामटेकडी परिसरात असल्याची माहिती चतुःश्रुंगी च्या डीबी पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जाधव आणि कर्मचाऱ्यांनी परिसरात धाव घेतली. त्यावेळी दुधानी याला पोलिसांची कुणकुण लागली. त्याने काही क्षणातच येथील जंगलात पळ काढला. पोलिसांनी देखील त्याचा पाठलाग सुरू केला. यावेळी पथकाने तास ते दीड तास त्याचा पाठलाग करून त्याला पकडलेले. दीड तासांच्या या थरारांनंतर त्याला पकडण्यात यश आले आहे. पण आता त्याचे साथीदार अद्याप तरी सापडलेले नाहीत. त्यांना पकडणे आव्हान असणार आहे.

दुधानी हा कूविख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर घरफोड्याचे 100 हुन अधिक गुन्हे दाखल आहेत.