मालकाचं घर फोडणार्‍या चालकाला अटक, 30 तोळे सोन्याचे दागिने जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – घर मालकाच्या घराचं घरफोडीकरून पसार झालेल्या वाहन चालकास पोलिसांनी अटक केली आहे. तो वाहन चालक म्हणून काम करत होता. त्याच्याकडून 30 तोळे सोने जप्त केले आहे. तीन महिन्यांपूर्वी खडीमशिन चौकात हा घरफोडीचा गुन्हा घडला होता.

याप्रकरणी प्रवीण चंद्रकांत गायकवाड (सध्या रा. किरकिटवाडी पुणे मूळ रा. बलुर्गी तालुका अफजलपुर जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ नामे काशिनाथ चंद्रकांत गायकवाड (वय २८ वर्ष रा.बलुर्गी तालुका अफजलपुर जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक) या दोघांविरोधात कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल आहे. याबाबत संदीप बधे (रा.खडीमशीन चौक,कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे घरास कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गेले होते. त्यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. तसेच कपाटातील ३२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ९ लाख ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या गुन्ह्याचे तपास करीत असताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रफीत आणि इतर तांत्रिक माहिती च्या आधारे सदरची चोरीही फिर्यादी यांच्याकडे वाहनावर चालक असलेला प्रवीण याने भावाच्या मदतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

पोलिसानी आरोपीच्या पुण्यातील पत्त्यावर शोध घेतला असता तो मिळून आला नव्हता. कर्नाटक राज्यातील स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली होती. त्यानुसार गुलबर्गा ग्रामीण पोलिसानी काशिनाथ चंद्रकांत गायकवाड ६ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष शिंदे, कर्मचारी इक्बाल शेख, योगेश कुंभार ,पृथ्वीराज पांडुळे, कौस्तुभ जाधव ,अजीम शेख, मोहन मिसाळ उमाकांत स्वामी यांच्या पथकाने गुलबर्गा येथे जाऊन प्रवीण ला गुन्ह्यात अटक केली.

पोलीस कोठडी दरम्यान तपास केला असता त्याने घरफोडीच्या गुन्ह्यात चोरलेले तीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दुधनी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणावरून जप्त केले आहे.