Pune : अंमली पदार्थाच्या विक्रीच्या तयारीत असलेल्या एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या तयारीत असताना एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. भवानी पेठ येथे ही कारवाई केली. त्याच्याकडून ६२ हजार रूपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे.

आसीफ युसूफ खान (वय ३६ वर्षे रा. ४९ ,भवानी पेठ पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेत एक व्यक्ती मेफेड्रोन या अमली पदार्थाची विक्री करीत आहे, अशी माहिती खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक (पुर्व) च्या पथकास मिळाली. त्यानुसार सपोनि ढेंगळे, कर्मचारी राहीगुडे, बोमादंडी, साळुंखे, शिंदे, दळवी आणि छडीदार यांनी सापळा रचून स्वामी समर्थ चौकाकडून डावरे चौकाकडे जाणाऱ्या खान याला पकडले. चौकशी केली असता त्याच्याकडे १२ ग्रॅम ३७० मि. ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपीला खडक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.