MBBS प्रवेशाच्या बहाण्याने 29 लाख घेऊन पसार झालेला पुण्यात सापडला

टिंगरेनगरमधून विश्रांतवाडी पोलिसांनी पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – छत्तीसगढ येथील तरुणीला मुंबईच्या टेरेना मेडीकल महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 29 लाख घेऊन पसार झालेला पुण्यात सापडला आहे. टिंगरेनगरमधून त्याला विश्रांतवाडी पोलीसांनी अटक केली आहे.

संतोष कुमार सहानी (रा. छत्तीसगढ) असे पकडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जागेश्वरी देवागन यांनी छत्तीसगढ पोलीसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, संतोष याच्यावर फसवणूकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कुमार हा मूळचा झारखंडमधील रायपूरचा आहे. त्याची स्वतःची फ्युचर केअर कंन्सलटन्सी फर्म आहे. त्याने जागेश्वरी यांना मुंबईतील टेरेना मेडीकल महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. तसेच, त्यांचा विश्वास संपादन करून बँकखात्यावर टप्प्याटप्प्याने 29 लाख 15 हजार रुपये घेतले होते. मात्र, प्रवेश मिळाला नाही. तसेच, पैसेही परत न करता त्यांची फसवणूक केली होती. त्यानंतर तो पसार झाला होता.

तांत्रिक तपासादरम्यान संतोषकुमार पुण्यातील विमानतळ परिसरातील टिंगरेनगरमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छत्तीसगढ पोलिस पथकासह विश्रांतवाडी पोलिसांनी टिंगरेनगरमध्ये सापळा रचून संतोषकुमारला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला छत्तीसगढ पोलिसांच्या ताब्यात दिले.

वरिष्ठ निरीक्षक अरुण आव्हाड, पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर, दीनकर लोखंडे, प्रवीण भालचिम, विनायक रामाणे, वामन सावंत, झारखंड पोलिस पथकातील रजनीकांत दिवाण, संतोष शर्मा, रवी साव यांच्या पथकाने केली.