पुण्यात पोलिस आयुक्तांनी पाठवलं ‘त्या’ सहाय्यक आयुक्तांना सक्तीच्या रजेवर, कारण गुलदस्त्यातच, खात्यात चर्चा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस आयुक्तालयातील ’पारदर्शक’ कारभार सध्या चर्चेचा विषय ठरत असून, पोलिस आयुक्तांच्या ’नजरे’तून एकही गोष्ट सुटत नसल्याने सर्वचजण ’गॅस’वर आहेत. असंच काहीसं झालं अन् पोलिस आयुक्तांची नजर सहाय्यक आयुक्तांवर पडली. मग, काय सीपींनी एसीपींना थेट 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवरच पाठविले. त्यामुळे पोलीस दलात हा विषय चर्चीला जात आहे. विषेश म्हणजे, मुदत वाढवून पुन्हा ‘त्या’ एसीपींना सक्तीच्या रजेवर पाठविले जाणार, अशी चर्चा आयुक्तालयात सुरू आहे.

पोलीस आयुक्तालयात शेकडो नागरिक वेगवेगळी कामे घेऊन अधिकार्‍यांकडे येतात. पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त यासोबतच गुन्हे शाखा व विशेष शाखेचे अधिकारी आयुक्तालयात बसतात. तर, परवानगी किंवा अडचणी घेऊन अनेकजण येत असतात. त्यामुळे अधिकार्‍यांनी साधारण येणार्‍या नागरिकांना भेटण्याची एक वेळ ठेवलेली असते.

मात्र, सक्तीच्या रजेवर गेलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे (एसीपी) विशेष शाखा व नियंत्रण कक्षाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ‘या’ एसीपींच्या ’कॅबिन’ला अनेकजन बसलेले असायचे. काहीनिमित्त भेटण्यासाठी अन् काही ओळखीचे असायचे. पण, याची चर्चा पुर्ण पोलीस आयुक्तालयात सुरू झाली. त्यामुळे कर्मचारी अन् कनिष्ठ अधिकारी वैतागले होते, असे खासगीत बोलताना काही जणांनी सांगितले. ही बाब पोलीस आयुक्तांना सांगण्यात आली. आयुक्तांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी ‘या’ एसीपींना थेट सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पोलीस दलात सक्तीच्या रजेची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता कोणाला कॅबिनला घेऊन बोलत बसणे किंवा बाहेरून भेटण्यासाठी येणार्‍यांबाबत काहींनी काळजी घेतल्याची चर्चादेखील सुरू आहे.

उपायुक्तांचे चारवेळा ‘लोकेशन’

पुणे पोलीसांच्या कारभाराची पुणे पोलीस दलातच नव्हे तर पिंपरी-चिंचवड, ग्रामीण अन् अतिवरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये सध्या चर्चा होऊ लागली आहे. वेगवेगळ्या कारणे असली तरी त्यात एका अतिवरिष्ठ अधिकार्‍याची नकारात्मकच चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. अतिवरिष्ठांच्या आदेशानुसार 5 ही परिमंडळचे पोलीस उपायुक्तांचे दिवसातून चार वेळा लोकेशन घेतले जात आहे. यापुर्वी असे कधीच झाले नव्हते, असे देखील काही अधिकारी बोलून दाखवत आहेत. तर, कार्यालयात साडे आठपर्यंत थांबावे, असे सांगितले गेले आहे. एकूणच ‘या’ कारभारामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मनात नाराजीचा सूर निघत असून, त्याची आता खुलेआम चर्चा होऊ लागली आहे.