तडीपार गुन्हेगार पुण्यात शिरताच वाजणार ‘अलर्ट’ ! मोबाईल अ‍ॅप्लिकेशन कार्यान्वित

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – शहरात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगारांना तडीपार केल्यानंतरही ते अनेकदा शहरात येऊन गुन्हे करीत असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत जाऊ लागले आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरी अथवा राहण्याच्या ठिकाणी जाऊन त्यांना चेक करणे, धोक्याचे ठरू शकते.

त्यासाठी पुणे पोलिसांनी होम क्वारंटाईन केलेल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी वापरलेल्या ट्रॅकिंग सिस्टिम प्रमाणे तडीपार गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. त्याचा प्रत्यक्ष वापर आजपासून सुरु करण्यात आला आहे. हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यासाठी सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी विशेष प्रयत्न केले.

हडपसर पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार विराज जगदीश यादव (वय २४, रा. सुशय सृष्टी अपार्टमेंट, हांडेवाडी रोड, हडपसर) याला पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी १ वर्षासाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. यादव याला पुणे जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यात येणार आहे. त्याच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप्लिकेशन अपलोड करण्यात आले आहे. त्या आधारे त्याने हद्दपारीच्या काळात ज्या ठिकाणी राहण्याची इच्छा व्यक्त केली.

त्या ठिकाणावरुन दररोज मोबाईल सेल्फीच्या माध्यमातून त्याची हजेरी घेण्यात येणार आहे. तसेच तो पुन्हा हद्दपारीच्या काळात पुणे शहर व पुणे जिल्ह्यात विना परवानगी प्रवेश करेल, त्याचा त्वरीत अलर्ट मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर प्राप्त होऊन त्याच्यावर वेळीच कारवाई करणे शक्य होणार आहे. या मोबाईल अ‍ॅपमुळे तडीपार गुन्हेगारावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.