Pune : खंडणीच्या गुन्हयातील फरार रविंद्र बर्‍हाटेच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या घरावर पोलिसांचे छापे, महत्वाची कागदपत्रे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेला व फरार घोषीत केलेला आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे व त्याचे नातेवाईकांच्या घरावर पुणे पोलिसांनी छापे टाकले आहेत. एका घरातुन आणखी काही कागदपत्रे पोलिसांना मिळाली आहेत.

याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकास 2 कोटी व जागा मागत दीड लाखाची खंडणी घेतल्याप्रकरणी बऱ्हाटे पाच जणांवर गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यात यापूर्वी पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, अमोल चव्हाण आणि एका महिलेला अटक करण्यात आली होती. मात्र हा गुन्हा दाखल होताच बऱ्हाटे पसार झाला आहे. पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर या टोळीवर शहरात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे पोलीस जंगजंग पछाडत आहेत. पण, रवींद्र बऱ्हाटे काही पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे दिसून येत आहे. उच्च न्यायालयाने त्याचा अटक पूर्व जामीन फेटाळला होता. यानंतर त्याला आता फरार घोषित केले आहे. या टोळीवर नुकतीच मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.

कोथरुड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान आज परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी अचानक तीन पथके तयार केली आणि त्याच्या घरावर छापे टाकले. धनकवडी, लुल्लानगर आणि बिबवेवाडी परिसरात असणाऱ्या घरावर एकाच वेळी छापे टाकले आहेत. धनकवडी येथील घरातून पोलिसांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सापडली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.

कोथरूड पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल होताच बऱ्हाटे पसार झाला. त्याने सत्र न्यायालय, मुंबई न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी प्रयत्न केले आहेत. पण न्यायालयाने फेटाळले आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून पुणे पोलिसांना बऱ्हाटे सापडत नसून, यामुळे पुणे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.