Pune : पुर्ववैमनस्यातून त्यानं 3 महिन्यांपुर्वी केले होते पोलिसाच्या भावावर वार, बदला घेत ‘लाईन बॉय’ अनिकेतनं केलं त्याला ‘खल्लास’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पूर्ववैमनस्यातून तरुणावर भरवस्तीत एका पोलिसाच्या लहान भावाने कुऱ्हाडीने सपासप वारकरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचा भाऊ पुणे पोलीस दलात कर्तव्यास आहे.

क्षितिज कांताराम वैरागर (वय 21, रा. औंध गाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी अनिकेत दिलीप दिक्षित (वय 23, रा. बॉडीगेट पोलीस लाईन, औंध) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैरागर व आरोपींमध्ये पूर्वीचे वाद होते. क्षितिज याने तीन महिन्यांपूर्वी अनिकेत याच्यावर वार केले होते. याचा राग अनिकेत याच्या मनात होता. दरम्यान क्षितिज याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. तर चतुशृंगी पोलीस ठाण्यात यापूर्वीचा असे दोन गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान आज क्षितिज हा सात वाजण्याच्या सुमारास येथील मुख्य चौकात थांबला होता. त्यावेळी आरोपी अनिकेत हा कुऱ्हाड घेऊन आला. तसेच त्याने क्षितिज याच्या डोक्यात कुऱ्हाडीने पाठीमागून वार केले. त्यानंतर तो पसार झाला. अचानक भर चौकात झालेल्या या घटनेमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच चतुशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. अनिकेत याचा भाऊ नितीन दीक्षित हे पुणे शहर पोलीस दलात बीडीडीएस नेमणुकीस आहेत. अधिक तपास सुरू आहे.