Lockdown : पुण्यात लॉकडाऊनमध्ये देशी अन् विदेशी विक्री, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – संचारबंदीत शहरात छुप्या पध्दतीने अवैधरित्या विदेशी आणि देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून गुन्हे शाखेच्या पथकांनी वानवडी परिसरात छापा टाकून गावठी दारूचे कॅन जप्त केले आहेत. 25 भरलेले आणि 25 मोकळे कॅड जप्त करण्यात आले आहेत.

याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई आहे. तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद आहेत. मात्र त्यांनंतर शहरात छुप्या पद्धतीने दारू विक्री होत आहे. सकाळी कोरेगाव पार्क परिसरातील एका मोठ्या बारमध्ये कारवाई केली असताना गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचारी संदीप साबळे, उदय काळभोर, अमोल पिलानी यांना बामतीदारामार्फत माहिती मिळाली की, वानवडी परिसरात बी.टी. कवडे रस्त्यावरील कृष्णा नगर येथे हातभट्टी मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात आली आहे.

त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकून पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी भरलेले 25 कॅड जप्त केले असून 25 मोकळे कॅड मिळाले आहेत. त्यांनी ही दारू यवत परिसरातून आणल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेऊन अधिक तपास करण्यासाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.