पुणे ग्रामीण : लोणावळयात माजी शिवसेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या, धारदार शस्त्रानं वार करून झाडल्या 3 गोळया, 24 तासात 2 खून

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – लोणावळा शहर दोन हत्यांनी हादरले असून, त्यात शिवसेना माजी शहरप्रमुख कै. उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल शेट्टी यांची आज (सोमवार) सकाळच्या सुमारास जयचंद चौकातील राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

यासंदर्भात मिळालेल्या माहिती अशी की, राहुल उमेश शेट्टी यांची दोघा अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना लोणावळा शहरात घडली असून शेट्टी हे घराजवळील हॉटेलमध्ये चहा पित बसले असताना अचानक दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी शेट्टी यांच्या डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत जवळून तीन गोळ्या झाडल्या आहेत. त्यानंतर त्यांना तातडीने लोणावळ्यातील परमार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला आहे. या हत्ये प्रकरणी एक प्रत्यक्षदर्शी असून पोलिसांनी या प्रकारचा तपास सुरु केला आहे.

दुसरीकडे, हनुमान टेकडी येथे राहणाऱ्या गणेश नायडू या तरुणाचा दादागिरी करत असल्याच्या कारणावरुन धारदार शस्त्रांनी खून करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी एकास अटक केली आहे. तथापि, गेल्या चार पाच दिवसांपूर्वीच सुरज अग्रवाल नामक व्यक्तीला दोन गावठी पिस्टल, कोयता व चाकू या हत्यारांसोबत पोलिसांनी पडकला होता. दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

You might also like